आक्षेपार्ह शब्द वापरणाऱ्या खडसेंना अटक करा : अंजली दमानिया 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त (ता.2) मुक्ताईनगर येथे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात त्यांनी आपल्याविरूध्द आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे काही आपल्या हितचिंतकाने सांगितले; मात्र त्यावेळी आपल्याकडे कोणतेही पुरावे नव्हते. त्या सभेचा व्हिडिओ आपल्याला मिळाला आहे. आपण तो पाहिला असता त्यांनी वापलेली भाषा ऐकून तीव्र संताप आला. त्यांनी यापूर्वीही माझ्याविरूध्द अपमानकारक भाषा वापरली असून ही त्यांची तिसरी वेळ आहे.

जळगाव : 'मुक्ताईनगर येथे झालेल्या सभेत भाजपचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी माझ्याविरुद्ध आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यांच्याविरुद्ध भा. द. वि. कलम 345 नुसार कारवाई करत तातडीने अटक करावी', अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. 

याबाबत दमानिया यांनी जळगावचे पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे आणि जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना लेखी पत्र दिले आहे. सभेत झालेल्या भाषणाचा व्हिडिओही त्यांनी पुरावा म्हणून दिला आहे. याशिवाय 'मुंबईत सांताक्रूझ येथील वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी लवकरच गुन्हा दाखल होईल', असे दमानिया यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

'दमानिया यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा खडसे यांनी इन्कार केला आहे. याआधीही दमानिया यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. पण ते सिद्ध होत नसल्याने आता त्या असे आरोप करू लागल्या आहेत', अशी प्रतिक्रिया खडसे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली आहे. 

दमानिया यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की 'खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त (ता.2) मुक्ताईनगर येथे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात त्यांनी आपल्याविरूध्द आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे काही आपल्या हितचिंतकाने सांगितले; मात्र त्यावेळी आपल्याकडे कोणतेही पुरावे नव्हते. त्या सभेचा व्हिडिओ आपल्याला मिळाला आहे. आपण तो पाहिला असता त्यांनी वापलेली भाषा ऐकून तीव्र संताप आला. त्यांनी यापूर्वीही माझ्याविरूध्द अपमानकारक भाषा वापरली असून ही त्यांची तिसरी वेळ आहे. यावेळी त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. मी अतिशय नाराज असून त्यांना कलम 354 अंतर्गत तातडीने अटक करावी अशी मागणी आहे.' 

याबाबत दमानिया यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, की रात्री जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांना ई-मेल केला आहे. सकाळी आपण जिल्हाधिकारी किशोरराजे निबांळकर आणि जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्याशी संपर्क भ्रमणध्वनीवरून चर्चा करून कारवाईची मागणी केली आहे. तसेच मुंबईत सांताक्रुझ येथील वाकोला पोलीस स्टेशनला आपण आता तक्रार दाखल करीत असून लवकरच या प्रकरणी गुन्हा दाखल होईल. 

व्हिडिओ मागविला : कराळे 
जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना सांगितले, की आपल्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे. तसेच खडसे यांच्या भाषणाचा तो व्हिडिओ आपण मागविला आहे. त्याची चौकशी करून जर त्यात आक्षेपार्ह वाटले तर कारवाई करण्यात येईल. 

आक्षेपार्ह बोललो नाही: खडसे 
खडसे म्हणाले, की वाढदिवसाच्या भाषणात आपण कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नाही. या अगोदरही दमानीया यांनी आंपल्यावर आरोप केले आहेत. मात्र कोणतेही आरोप सिध्द होऊ न शकल्यामुळे त्या आपल्यावर असे वारंवार आरोप करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites Jalgaon News Eknath Khadse Anjali Damania