नेतृत्व विकास कार्यक्रमासाठी सरसावल्या शैक्षणिक संस्था

नेतृत्व विकास कार्यक्रमासाठी सरसावल्या शैक्षणिक संस्था

नाशिक : सर्वच क्षेत्रांत आज झपाट्याने बदल होत आहेत. याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही पारंपरिक किंवा विशिष्ट शाखेतील शिक्षणाच्या जोडीला कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. त्यासाठी 'यिन-सिमॅसिस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम' अतिशय उपयुक्‍त ठरेल, असा विश्‍वास शैक्षणिक संस्थाचालक, प्राचार्यांनी व्यक्त करत आम्ही आमच्या महाविद्यालयात शंभराहून अधिक विद्यार्थी नोंदणी केली आहे. पुढील काळातही विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेऊ, अशी हमीपत्रे संस्थांनी 'सकाळ' माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक तथा 'एपी ग्लोबाले'चे चेअरमन अभिजित पवार यांना दिले. 

पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळपासून झालेल्या विविध कार्यक्रमांना नाशिकमधील नामांकित प्रमुख संस्थाचालक, प्राचार्य, विद्यार्थ्यांसह महिलांनी उत्स्फूर्त हजेरी लावली. चर्चा, संवादातील प्रत्येकाचा उत्साहही ओसंडून वाहणारा दिसला.

संस्थाचालक-प्राचार्यांशी संवाद साधताना पवार यांनी जागतिक स्तरावरील बदलत्या शिक्षण पद्धतीचा आढावा घेतला. शिक्षण क्षेत्रातील बदल आत्मसात करणाऱ्या शिक्षण संस्थांना 'एपी ग्लोबाले'च्या माध्यमातून पाठबळ दिले जाईल. सर्व संस्थांनी मिळून शहर-जिल्ह्यात हव्या असलेल्या कौशल्य शिक्षणाची गरज निश्‍चित केल्यास तशा पद्धतीचे शिक्षण, प्रशिक्षण देण्यासाठी विशेष अभ्यासक्रम अवगत करण्याची तयारीही त्यांनी या वेळी दर्शवली. या वेळी शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्यांनी 'यिन-सिमॅसिस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम'चे जल्लोषात स्वागत केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर ठरणार आहे. अभ्यासक्रमात कुठलाही खंड न पडू देता शैक्षणिक संकुलातच या शिक्षणक्रमाची व्यवस्था होणार असल्याचा आनंद या वेळी व्यक्‍त करण्यात आला. 

तरुणांच्या सहभागातून समाजविकासाची क्रांती 
'यिन लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम'अंतर्गत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात विद्यार्थ्यांशी पवार यांनी संवाद साधला. औक्षणानंतर विद्यार्थ्यांचा पवार यांच्याभोवती गराडा पडला. कुणी सेल्फी काढण्यात, कुणी त्यांच्याशी चर्चा करण्यात व्यग्र होते. अनेकांनी आपण करत असलेल्या वेगळ्या प्रयोगांची माहितीही दिली. पवार यांनी विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधत त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. 

कोणत्याही विद्याशाखेत आपण शिक्षण घेत असला, तरी त्याचा नक्कीच फायदा होत असतो; पण शिक्षण घेताना अथवा व्यवसाय-नोकरी-उद्योग करताना आपण समाजाचे देणे लागतो. या भावनेतून विचार करायला हवा, असे अभिजित पवार यांनी आज येथे अधोरेखित केले. तरुणांच्या सामिलकीतून समाजाच्या विकासाची क्रांती होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. समाजाच्या विकास प्रक्रियेत 'सकाळ माध्यम समूहा'चे कायम पाठबळ राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

तनिष्का प्रतिनिधींचा सत्कार 
तनिष्कांसाठी 'सकाळ' हे हक्काचे व्यासपीठ आहे. राज्यातील प्रसिद्ध घरगुती खाद्यपदार्थ हे पॅकेजिंग करून ते देशविदेशांत निर्यात करत या व्यवसायातून समाजाचा फायदा करून देता येऊ शकतो. यासाठी काम करण्याची आवश्‍यकता अभिजित पवार यांनी व्यक्त केली. त्यांच्या हस्ते तनिष्का श्री प्रतिष्ठा अभियानला पाठबळ देणाऱ्या बाजीराव तिडके, गोवर्धन कुलकर्णी, प्रा. रावसाहेब पाटील, डॉ. श्रीकांत खरे, मकरंद सोनवणे, विमल आचारी, सुगंधा टर्ले यांचा तसेच तनिष्का नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत निवडून आलेल्या तनिष्का प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. 

डिजिटल इपॅक्‍ट स्क्वेअरला भेट 
इंदिरानगर परिसरातील डिजिटल इपॅक्‍ट स्क्वेअरला अभिजित पवार यांनी भेट देत संशोधन कार्य; तसेच नाशिकमधील स्टार्टअपविषयी माहिती घेतली. कुंभथॉन चळवळीचा आतापर्यंतचा प्रवास कुंभथॉनचे सहसंस्थापक संदीप शिंदे यांनी सांगितला. या वेळी गिरीश पगारे, भावेश भाटिया आदी उपस्थित होते. 

विद्यार्थी सहभागासाठी संस्थांकडून हमीपत्रे 
सपकाळ नॉलेज हबतर्फे कॅम्पस डायरेक्‍टर डॉ. व्ही. बी. रायते, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर दुलाजी सीताराम पाटील, कृषी महाविद्यालयातर्फे मविप्र संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक नाना महाले, सचिन पिंगळे, प्राचार्य डॉ. आय. बी. चव्हाण यांनी हमीपत्र सुपूर्त केले. क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेतर्फे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, संचालक डॉ. धर्माजी बोडके, शताब्दी इस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगतर्फे अध्यक्षा ललीता वीर, विश्‍वस्त प्रीत वीर, स्नेहल वीर, नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ब्रह्मा व्हॅलीचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, मेट भुजबळ नॉलेज सिटीतर्फे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्षीरसागर, एमबीए इस्टिट्यूटचे संचालक डॉ. नीलेश बेराड, रवींद्र माणके यांनी हमीपत्र सुपूर्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com