गणिताचे भय काही संपत नाही

representational image
representational image

नाशिक : गणित हा बहुतांश विद्यार्थ्यांच्या अंगावर काटा आणणारा विषय. बोर्डाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये गणित विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असते. आजही परिस्थिती बदललेली नसून गणिताविषयी विद्यार्थ्यांमधील भय संपलेले नाही. गणितातील मूलभूत संकल्पना स्पष्ट होत नसल्याने विद्यार्थी पिछाडीवर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

अख्ख्या जीवनाचे गणित, हे गणित विषयावर अवलंबून आहे, असे गंमतीने अनेक ठिकाणी म्हटले जाते. या वाक्‍यात काहीअंशी तथ्यदेखील आहे. पदवी, पदव्युत्तर पदवीपासून अन्य विविध अभ्यासक्रमांत विशेषतः विज्ञान, वाणिज्य शाखेशी निगडित अभ्यासक्रमांत सामान्य गणित विषय महत्त्वाची भूमिका बजावतो. गणिताच्या मूळ संकल्पना स्पष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाचे आकलन सहज होते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांमध्ये गणिताच्या मूळ संकल्पनात स्पष्ट होत नसल्याची गंभीर समस्या अद्याप कायम आहे. 

बहुतांश विद्यार्थी गणिताबाबत घाबरून केवळ उत्तीर्ण होण्यासाठी धडपड करतात. यातून संकल्पना समजून घेत नाहीत, असे सामान्य निकर्ष असल्याचे तज्ज्ञ सांगतात. गणिताविषयी विद्यार्थ्यांत भय नव्हे, तर गोडी निर्माण होईल, अशा पद्धतीने शिक्षकांनी शिकवायला हवे, अशी अपेक्षादेखील व्यक्‍त केली जाते आहे. पालकांनीदेखील विद्यार्थ्यांच्या मनात गणिताविषयीची भीती दूर करण्यासाठी त्याला विश्‍वासात घेत मनोबल वाढविण्याची आवश्‍यकता असल्याचे बोलले जात आहे. 

नववीच्या अभ्यासक्रमात बदल; दहावीसंदर्भात स्पष्टता नाही 
यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीच्या गणित विषयाच्या अभ्यासक्रमात बदल करत काठीण्यपातळी घटवली आहे. त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्षात दहावीचा अभ्यासक्रमात सुधारणा केल्या जातील. पण बोर्डाच्या गुणपद्धतीत नेमके काय बदल होतील, याबद्दल स्पष्टता नाही. शिक्षणक्रमातील बदल हा गणित विषयाची समस्या दूर करण्यासाठी पर्याय असू शकत नाही, असेदेखील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

गणिताच्या मूळ संकल्पना समजून घेतल्यास या विषयाइतका सोपा विषय अन्य कुठला नाही. गुण मिळविण्याच्या अट्टहासात गणित विषयाच्या मूळ संकल्पनांकडे दुर्लक्ष करायला नको. 
- युवराज निकम, गणित शिक्षक, जाजू विद्यालय, राणेनगर

गणितीय संकल्पना स्पष्ट न झाल्याने गणिताची भीती वाटते. अभ्यासक्रम बदलताना या सर्व बाबींची काळजी घेतली जाते. हे खरे असले, तरी त्याची अंमलबजावणी प्रभावी झाली तरच गणित शिकणे आणि शिकवणे आनंददायी होईल. 
- संजयसिंग चव्हाण, ज्येष्ठ गणित शिक्षक, देवळाली हायस्कूल, देवळाली कॅम्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com