महापौर निवडणुकीत आमदारांचा लागणार कस

residentional photo
residentional photo

नाशिक ः महापौर पदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांकडून "फिल्डिंग' लावण्यास सुरवात झाली आहे. त्या-त्या भागातील इच्छुकांनी आमदारांकरवी नावे पुढे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महापौर पद एकच असल्याने त्यावर समर्थकांची वर्णी न लागल्यास आमदारांसमोर अडचणी निर्माण होणार आहेत, तर समर्थकांना महत्त्वाची पदे मिळाल्यास महापालिकेवर आमदारांचे वर्चस्व राहणार आहे. 

शहरात पूर्व, पश्‍चिम व मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले आहेत, तर देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार आहेत. महापालिकेवर निर्विवाद सत्ता गाजवायची असेल, तर त्यासाठी महापौर हे महत्त्वाचे पद हाती असणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजपच्या तिन्ही आमदारांकडून समर्थक नगरसेवकांना महापौर किंवा उपमहापौरपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न असतील. पावणेतीन वर्षांत महापौर रंजना भानसी यांच्याकडे माजी आमदार बाळासाहेब सानपसमर्थक म्हणून पाहिले गेले. सानप सांगतील तीच पूर्व दिशा आतापर्यंत राहिली आहे. महापालिकेवर वर्चस्व म्हणजे संपूर्ण शहरावर वर्चस्व हे आतापर्यंतच्या सत्ताकारणातून दिसून आले आहे. आता सानप यांच्याकडे महत्त्वाचे पद तर नाहीच शिवाय त्यांनी पक्षबदलही केला आहे. त्यामुळे आमदारांमध्ये आता स्पर्धक नाही. 

महाजनांची भूमिका महत्त्वाची 
महापालिकेत सत्ता आल्यानंतर काही काळ तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांचे हस्तक म्हणून सानप यांनी काम पाहिले. आता सानप पक्षात नसल्याने महाजन यांना प्रतिनिधी म्हणून तिन्ही आमदारांपैकी एकाला हाताशी धरावे लागेल. आमदार सीमा हिरे व प्रा. देवयानी फरांदे यांच्यापेक्षा ऍड. राहुल ढिकले यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास महापौरांचे नाव घोषित करताना आमदार ढिकले यांच्या शब्दाला महत्त्व राहणार आहे. 

आमदारांसमोर पेच 
यंदाच्या पंचवार्षिकमधील पहिले महापौरपद पंचवटी विभागाला मिळाले. आता सातपूर व नाशिक रोड भागाला महापौर, उपमहापौरपद मिळावे, अशी मागणी जोर धरत आहे. त्यादृष्टीने आमदारांकडे फिल्डिंग लावली जात आहे. पश्‍चिम विभागापासून सुरवात केल्यास दिनकर पाटील, अलका आहेर यांचा महापौर पदावर दावा आहे. विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी आमदार हिरे यांना सातपूर विभागातून मोठे मताधिक्‍य मिळवून दिल्याने आमदार हिरे यांना पाटील यांचे नाव लावून धरावे लागेल. मात्र दुसरीकडे दीर योगेश हिरे यांनाही महापौर होण्याची इच्छा असल्याने आमदार हिरे यांच्यासमोर पेच असेल. मध्यमध्ये आमदार फरांदे समर्थकांमध्ये स्वाती भामरे व सतीश कुलकर्णी यांच्यापैकी एकाचे नाव द्यावे लागेल, पण या विभागातून हिमगौरी आडकेही महापौर पदाच्या प्रबळ दावेदार आहेत. 

पूर्वमध्ये अडचण 
पूर्व विधानसभा मतदारसंघात महापौर पदावरून पुन्हा पेच निर्माण होणार आहे. पंचवटी विभागाला दुसऱ्यांदा महापौरपद दिल्यास असंतोष निर्माण होण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे नाशिक रोड विभागाला महापौर पदापासून सातत्याने डावलले जात असल्याची भावना आहे. नाशिक रोड भागातून महापौर दिल्यास पुन्हा पूर्व विधानसभा मतदारसंघाकडेच शहराचे प्रतिनिधित्व जात असल्याने त्यातून मध्यम मार्ग काढण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर राहील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com