girna river brege
girna river brege

गिरणा पूल बनला धोकादायक

मेहुणबारे (ता. चाळीसगाव): चाळीसगाव- धुळे महामार्गावरील विंचूर (ता. धुळे) पुलावरून पिकअप गाडी कोसळून बोरी नदीपात्रात सात जण ठार झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली. या पुलाच्या दुरवस्थेसंदर्भात ‘सकाळ’ २५ दिवसांपूर्वी फोटोसह वृत्त प्रकाशित केले होते. जवळपास अशीच परिस्थिती मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील गिरणा पुलाबाबत झाली आहे. या पुलाच्या दोन्ही बाजू कमकुवत झाल्या आहेत. त्यामुळे अपघाताची एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वीच पुलाची दुरुस्ती करून विशेषतः दोन्ही बाजूच्या कठड्यांची उंची वाढवावी, अशी मागणी होत आहे.
सध्या राष्ट्रीय प्राधिकरण विभागातर्फे खड्डे बुजवण्याचे काम सुरू असले तरी ते अतिशय संथ गतीने होत आहे. या रस्त्यावरील गिरणा पुलाच्या दोन्ही बाजू कमकुवत झाल्या आहेत. हा पूल वापरण्यायोग्य राहिलेला नसल्याने या पुलावरून चालताना भीती वाटते. १९७० मध्ये हा पूल बांधण्यात आला असून पुलाला ४७ वर्षे झाली आहेत. त्याच्या उघड्या अँगलची मध्यंतरी थातूरमातूर डागडुजी केली होती. पुलावर उभे राहिल्यानंतर हा पुल अक्षरशः हलतो. सद्यःस्थितीत दोन्ही बाजूच्या कठड्यांचे भक्कमपणे काम करण्याची मागणी होत आहे. दररोज हजाराच्यावर वाहनांची या पुलावरून ये जा असते. ज्यात अवजड वाहनांचाही समावेश असतो. या पुलाची वैधता शंभर वर्षे असली तरी सध्या धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.

विंचुर पुलासारखी स्थिती
या रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात ७ नोव्हेंबरला ‘सकाळ’च्या टुडे पानावर ‘एक खड्डा पडला नव्वद हजारात’ ही बातमी प्रसिद्ध झाली होती. ज्यात विंचूर पुलाच्या छायाचित्रासह सविस्तर मुद्दा मांडलेला होता. त्याची दखल राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने पुलाची दुरुस्ती केली असती तर कदाचित हा अपघात झाला नसता. विंचुर पुल १९६७ मध्ये बांधलेला असून तो इतका कमकुवत झालेला आहे, की तो केव्हाही कोसळू शकतो. या पुलाच्या दोन्ही बाजूला सुरक्षित संरक्षण कठडेच राहिलेले नाही. अशीच परिस्थिती मेहुणाबरे पुलाची झालेली आहे. या पुलावर एखाद्या गंभीर अपघाताची प्रशासन वाट पाहत आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

दुरुस्तीचे काम होतेय कासवगतीने
चाळीसगाव ते धुळे महामार्गाचे काम कासवगतीने सुरू असून दुरुस्तीसाठी एक कोटीपर्यंतचा खर्च होणार आहे. या कामाचे टेंडर ६ नोव्हेंबरला निघाल्यानंतर तीन महिन्यांची मुदत या कामाला देण्यात आली होती.येत्या ६ डिसेंबरला या कामाला एक महिना पूर्ण होत असतानाही पाहिजे तसे दुरुस्तीचे काम अद्यापही झालेले नाही. ज्या काही ठिकाणी डागडुजी करण्यात आली, ते काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले. या रस्त्यावर वारंवार होणारे अपघात लक्षात घेता, चांगल्या दर्जाचे साहित्य वापरून रस्ता दुरुस्तीची कामाला गती द्यावी, अशी मागणी होत आहे.

सध्या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भातील कामाच्या निविदेत विंचूर व मेहुणबारे या दोन्ही पुलांच्या दुरुस्तीचाही समावेश आहे. त्यामुळे या पुलांच्या दोन्ही बाजूंच्या कठड्यांचे काम लवकरच ‘आरसीसी’ करणार आहोत.
- हितेश अग्रवाल, अभियंता ः राष्ट्रीय महामार्ग विभाग, धुळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com