मॅटने दिला 154 पोलीस उपनिरीक्षकांना दिलासा,आता लक्ष,शासन,महासंचालकांकडे 

live
live

नाशिक : महाराष्ट्र पोलीस अकादमीतून दिमाखदार दीक्षांत सोहळ्यात शपथविधी घेतल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये मॅटच्याच आदेशान्वये अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील 154 पोलीस उपनिरीक्षकांना मूळ पदावर रुजू होण्याचे आदेश बजावण्यात आले आणि त्यांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्नच भंग पावले होते. परंतु, त्याविरोधात 154 जणांनी मॅटमध्ये धाव घेत दाद मागितली असता, मॅटनेच त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती करण्याचे आदेश देत मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे आता राज्यशासन आणि पोलीस महासंचालकांच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. 
   मॅटने शासनाच्या पदोन्नती अध्यादेशाचा आधार घेत त्या 154 पोलीस उपनिरीक्षकांची नियुक्ती रद्द केली होती. त्याबाबत संबंधितांनी पदोन्नतीने नव्हे तर लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस खात्याअंतर्गत परीक्षेतून त्यांची गुणात्मक दर्जानुसार नियुक्ती झाल्याचे सप्रमाण मॅटकडे सादर केले. त्याआधारे आज मॅटने पूर्वीचा आदेश रद्दबातल ठरवित, त्या 154 जणांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत.

आता मॅटच्या या आदेशाची अंमलबजावणी राज्यशासन व पोलीस महासंचालक तात्काळ करतात का, याकडे आता अनेकांचे लक्ष लागून आहे. मॅटच्या या निर्णयामुळे गेली 9 महिने महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये खडतर प्रशिक्षण घेतलेल्या 154 जणांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये गेल्या 5 तारखेला 817 पोलीस उपनिरीक्षकांचा दीक्षांत सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला होता. मात्र त्यानंतर काही तासांमध्येच या तुकडीतील अनुसूचित जाती-जमाती व विशेष प्रवर्गातील 154 जणांना पोलीस उपनिरीक्षकाच्या नियुक्तीऐवजी मूळ सेवेत रूजू होण्याचे आदेश मॅटने दिले होते.

आदेशाप्रमाणे राज्यशासन व पोलीस महासंचालकांनी अंमलबजावणी करीत गेल्या सोमवारी (ता.8) रात्री त्या 154 जणांना मूळपदावर रुजू होण्याचे आदेश बजावले आणि मंगळवारी (ता.9) पहाटे 5 वाजताच अकादमी सोडण्याचे फर्मान सोडले. त्यानुसार, त्यांना अकादमीतून अक्षरश: बळजबरीनेच बाहेर काढले गेले आणि त्यांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्नच भंग पावले होते. यासंदर्भातील वृत्त "सकाळ'मधून "स्वप्न भंगले' या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com