सटाण्यात ‘मनसे’चे रास्ता रोको, गडकिल्ले भाडे तत्वावर देण्याच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी

live
live

सटाणा  : राज्यातील शिवकालीनसह सर्व गडकिल्ले भाडे तत्वावर देत त्याचे हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर करून या ऐतिहासिक वास्तु  हॉटेल व मंगल कार्यालयासाठी देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे पडसाद राज्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उमटू लागले आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ सटाणा शहर व बागलाण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज शनिवार (ता.७) रोजी येथील चार फाटालगत शिवतीर्थ परिसरात विंचुर-प्रकाशा राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. यावेळी मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. 

   राज्यातील सर्व गड-किल्ल्यांना भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. बागलाण तालुक्यातील शिवकालीन ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी सटाणा शहर व बागलाण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आज दुपारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरातील शिवतीर्थावर एकत्रित आले. यावेळी कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आणि थेट विंचुर-प्रकाशा राज्य महामार्गावर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन छेडले. आज शनिवारी शहरात आठवडे बाजार असल्याने ऐन बाजारात रास्तारोको करण्यात आल्याने राज्य महामार्गावरील वाहतुक दुतर्फा ठप्प झाली होती.

यावेळी बोलताना मनसे तालुकाध्यक्ष सतीश विसपुते म्हणाले, गडकिल्ले म्हणजे आमच्या पूर्वजांच्या रक्तातून लिहिलेला इतिहास आहे. शिवाजी महाराजांबद्दल ज्यांना प्रेम नाही त्यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल आदर नाही. त्यांच्या हातात हे सरकार आहे म्हणून ते तुघलकी निर्णयही घेऊ शकतात. पण मराठी मातीबद्दल अभिमान असणारा प्रत्येक माणूस या निर्णयाला विरोध करेल असा विश्वासही श्री.विसपुते यांनी व्यक्त केला. शहराध्यक्ष पंकज सोनवणे यांनी राज्यातील भाजपा-सेना युती सरकारने गड व किल्ले हे विकसकांच्या खिशात घालण्याचा डाव खेळला असून महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांसह मराठा साम्राज्याचा इतिहास नामशेष करण्याचा शासनाचा कुटिल डाव असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, अचानक छेडण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. आंदोलनाची माहिती समजताच पोलिस निरीक्षक वासुदेव देसले हे तात्काळ कुमक घेऊन आंदोलनस्थळी दाखल झाले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर नंतर सोडून देण्यात आले. मनसेतर्फे तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात तालुकाध्यक्ष सतीश विसपुते, शहराध्यक्ष पंकज सोनवणे, सरचिटणीस मंगेश भामरे, रोहित जाधव, प्रीतेश बागुल, अनिल सोनवणे, विश्‍वास खैरनार, दादू बैताडे, रविंद्र देसले, संदीप शिरसाठ, पंकज मालपुरे, कुणाल पवार, रोहित बागुल, युवराज सोनवणे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com