औषधी वनस्पतींचा ठेवा जपणारे पंचकचे "डेर्ले स्कूल' 

कुणाल संत
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

नाशिक : बालवयात विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक सणाची केवळ माहिती न देता त्याचे प्रात्यक्षिक दाखवत विद्यार्थ्यांना हसतखेळत शिक्षण दिले जात आहे. महापालिकेच्या पंचक येथील 36 क्रमांकाच्या शाळेने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

नाशिक : बालवयात विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक सणाची केवळ माहिती न देता त्याचे प्रात्यक्षिक दाखवत विद्यार्थ्यांना हसतखेळत शिक्षण दिले जात आहे. महापालिकेच्या पंचक येथील 36 क्रमांकाच्या शाळेने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

16 विविध प्रजातींच्या औषधी वनस्पतींची लागवड करून "नक्षत्र वन' निर्माण करणारी ही महापालिकेची एकमेव शाळा आहे. आपल्या याच गुणांमुळे इतर नामांकित शाळांमधील मुलांनी या शाळेत प्रवेश घेतला आहे. 
पंचक येथील महापालिकेच्या 36 क्रमांकाच्या (स्व). रामकृष्ण बाबाजी डेर्ले मॉडेल स्कूलमध्ये पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात. 2006 मध्ये सुरू झालेल्या या शाळेत 482 विद्यार्थी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात विद्यार्थी सरस कामगिरी करीत आहेत. योग्य नियोजन आणि शिक्षकांमधील एकजुटीमुळे हे शक्‍य होत आहे. शिक्षणाप्रति प्रत्येक शिक्षकामध्ये एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा आहे. यामुळे विद्यार्थ्यांची कामगिरी सरस होण्यास मदत होते. 

अद्ययावत सुविधांमुळे वाढली शिक्षणाची गोडी 
प्रशस्त मैदान, एकशिस्त, स्वच्छतेचे धडे, डिजिटल शिक्षणाबरोबर संगीत व क्रीडाचे सखोल ज्ञान, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात सातत्याने भर पडावी, यासाठी शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिर, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या ज्ञानासाठी स्वतंत्र "नक्षत्र वन' आदी वैशिष्ट्ये आहेत. शिक्षणाबरोबरच क्रीडा विषयाला शाळेकडून प्राधान्य दिले जाते. दर शनिवारी नियमित विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश परिधान करावा लागतो. 

पारंपरिक सणाची प्रात्यक्षिकांद्वारे माहिती 
पारंपरिक होळी, रंगपंचमी, वसूबारस, बैलपोळा सणांची केवळ माहिती न देता त्याचे प्रात्यक्षिक दिले जाते. यासाठी बैलपोळ्याला थेट शाळेत बैल आणून त्याची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या वेळेस शाळेत लक्ष्मीपूजन केले जाते. सुटीच्या दिवशीदेखील शिक्षकवृंद शाळेत उपस्थित राहून नेहमी शाळेच्या प्रगतीच्या बाबतीत नियोजन करत असतात. भविष्यात शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा वाचण्यात व लिहिण्यात तरबेज करण्याचा मानस येथील शिक्षकवृंदाचा आहे. शाळेतील याच वैशिष्ट्यांमुळे पुरस्कारही शाळेला मिळाला आहे. 

अकरा वर्षांच्या काळामध्ये शाळेने महापालिका शिक्षण क्षेत्रामध्ये आपले वेगवेगळे उपक्रम आणि प्रगतीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. दर वर्षी विद्यार्थी पटसंख्या वाढतच आहे. पालकवर्गाचा कलदेखील महापालिका शाळेकडे वळविण्यात प्रशासनाला यश आले आहे हे केवळ उत्कृष्ट नियोजन, शिक्षणाप्रति प्रेम आणि शिक्षकांच्या एकजुटीमुळे. 
-बाळासाहेब निरगुडे, मुख्याध्यापक 
 

Web Title: marathi news model school