"एमपीएससी'साठी आता बायोमेट्रिक हजेरी 

विजय पगारे
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

इगतपुरी (जि. नाशिक) - परीक्षेला तोतया बसवून प्रशासनात उच्च पदाच्या जागा अनेक अधिकाऱ्यांनी पटकावल्याचे समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) या गैरप्रकारांना रोखण्यासाठी पाऊल उचलले आहे. आयोगाच्या परीक्षांसाठी यापुढे बायोमेट्रिक पद्धतीने हजेरीचा निर्णय आयोगाने घेतला. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध शासकीय पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात येतात. मात्र, त्या न देता आपल्याऐवजी दुसऱ्याच उमेदवाराला बसवून अगदी "अ' श्रेणीच्या पदांवर विराजमान झालेले अधिकारी प्रशासनात अद्याप कार्यरत आहेत. राज्याच्या प्रशासनात जवळपास पन्नास अधिकाऱ्यांनी तोतयांच्या जिवावर पदे मिळविल्याचे तपासात समोरही आले. तोतया परीक्षार्थींची ही साखळी समोर आल्यानंतर आता आयोगाला जाग आली आहे. त्यामुळे परीक्षांसाठी आता बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय आयोगाने घेतला आहे. 

गैरप्रकार टाळण्यासाठी उमेदवारांकडूनही बायोमेट्रिक हजेरी आणि परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर बसविण्याची मागणी करण्यात आली होती. यापूर्वी काही परीक्षांसाठी मोबाईल जॅमर बसविण्याचा प्रयोग आयोगाने केला. बायोमेट्रिक हजेरीसाठी उमेदवारांचे आधार क्रमांक आणि त्यावरील बोटाचे ठसे यांच्या आधारे ही हजेरी घेण्यात येईल. उमेदवारांना आधार क्रमांक नोंदवणे सक्तीचे असल्याची सूचना आयोगाने यापूर्वीच दिली आहे. त्यासाठी आयोगाकडून विविध कंपन्यांकडून प्रस्तावही मागविण्यात आले आहेत, असे आयोगातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: marathi news MPSC Biometric attendance nashik