एकनाथराव खडसेंचा रंगणार दुहेरी संघर्ष 

एकनाथराव खडसेंचा रंगणार दुहेरी संघर्ष 

सत्ताधारी भाजपसाठी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ संवेदनशील मानला जात आहे. एकनाथराव खडसे यांची उद्विग्नतेची कोंडी फोडणारी ही विधानसभा निवडणूक राहील. जिल्ह्याला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यासाठी जंग जंग पछाडणारे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार एकनाथराव खडसे यांच्यासारख्या नेत्यावर "हमे तो अपनोंने लुटा, गैरों मे दम था। मेरी कश्‍ती ही डुबी जहॉं पानी कम था।। असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या सर्व परिस्थितीत त्यांच्या उद्विग्नतेला तोंड फोडण्यासाठी विधानसभा निवडणूक हेच चांगले माध्यम आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचेच आव्हान असणार आहे. शिवाय युती न झाल्यास येथे शिवसेनाही त्यांना नामोहरम करण्यासाठी मैदानात उतरेल. त्यामुळे खडसेंना एकाच वेळी दोन प्रबळ प्रतिस्पर्ध्यांना तोंड द्यावे लागणार असून, त्यांच्याशी खडसेंचा दुहेरी संघर्ष या निवडणुकीत दिसणार आहे. 

सन 2014 च्या निवडणुकीत मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना लढत रंगली. एकनाथराव खडसे यांच्या विरुद्ध शिवसेनाप्रमुख जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, अशी ही लढत होती. एरवी दशकापासूनची राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेची छुपी युती या निवडणुकीत उघड झाली. अगदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अरुण पाटील यांची अनामत जप्त होण्याइतकी नामुष्की राष्ट्रवादी पक्षाला सहन करावी लागली. निकालाच्या आकडेवारीनंतर राष्ट्रवादीने अस्तित्व गमविल्याची ओरड झाली. आता राष्ट्रवादीसमोर पुन्हा अस्तित्व सिद्ध करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. 

विधानसभेत बंडखोरीचे सावट 
भाजपकडून विधानसभा उमेदवारीबाबत आमदार खडसे निश्‍चिंत आहेत. गेल्या निवडणुकीत युती तोडण्याची घोषणा भाजपने खडसे यांच्या तोंडी करवून घेतली आणि ते युतीचे खलनायक बनले. युती तुटल्याने येथून शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना विधानसभेत शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली. तब्बल पाच वेळा विधानसभा निवडून आलेल्या खडसे यांना सहाव्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी तुल्यबळ लढत दिली होती. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी येथे जाहीर सभा घेऊन निवडणुकीत रंग भरला होता. येथूनच चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढविला. खडसेंविरोधातील राष्ट्रवादी पक्षाचा मतदार येथे शिवसेनेकडे वळला आणि चंद्रकांत पाटील यांना 75 हजार 949 मते मिळाली. त्यामुळे आता युती झाली, तरी चंद्रकांत पाटील बंडखोरी करून निवडणूक लढवतील, असा जाणकारांचा अंदाज आहे. परिणामी चार पंचवार्षिक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणाऱ्या या मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना हे चित्र पुन्हा दिसू शकते. 

राष्ट्रवादीची पीछेहाट 
उमेदवारीच्या दृष्टीने शिवसेनेचे पाटील हे मतदारसंघात प्रचंड मेहनत घेत आहेत. तिकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष "चिंतन' आणि "मंथन'च्या मूडबाहेर पडल्याचे दिसत नाही. पक्षाची सक्रियता फारशी नाही. दुसरीकडे कॉंग्रेस पक्षाने मरगळ झटकली आहे. निवडक पदाधिकारी असले, तरी ते लोकांपर्यंत जात आहेत. वंचित बहुजन आघाडी देखील कामाला लागली आहे. लोकसभेत मतदारसंघातून त्यांनी 20 हजार मतांचा टप्पा पार केला आहे. 

मुक्ताईनगर मतदारसंघात तीन नगरपालिका, एक बाजार समिती, दोन पंचायत समित्या आणि जवळपास तीन चतुर्थांश विकास सोसायट्या व ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व आहे. भाजपपेक्षा शिवसेना सतत निवेदने, आंदोलन आणि उपक्रम करून मतदारसंघात सक्रिय आहे. राष्ट्रवादीचे निवडणूक कार्यालय वजा पक्ष कार्यालय सुरू झाले आहे; तर कॉंग्रेसच्या कायमस्वरूपी कार्यालयाची कार्यकर्ते वाट पाहत आहेत. 

विधानसभा 2014 
एकनाथराव खडसे (भाजप) ः 85657 
चंद्रकांत पाटील (शिवसेना) ः 75949 
अरुण पाटील (राष्ट्रवादी) ः 6499 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com