तापी नदीच्या जलपातळीत कमालीची घट 

तापी नदीच्या जलपातळीत कमालीची घट 

चांगदेव (ता.मुक्‍ताईनगर) ः दिवसेंदिवस उष्णतामान वाढत आहे. त्यामुळे चांगदेवसह परिसरात जलपातळी अधिक प्रमाणात खालावत आहे. चांगदेवसह परिसराला वरदान ठरलेल्या तापी-पूर्णा नद्यांच्या जलपातळीत सुध्दा यावर्षी कमालीची घट झाली आहे. तब्बल शंभर ते सव्वाशे मीटर पाण्याची पातळी किनाऱ्यापासून दूर गेल्याने तापी-पूर्णा नद्यांच्या जलाशयावर अवलंबून असलेली शेती धोक्यात आली आहे. याच कारणामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. 

दरवर्षी उन्हाळ्यात तापमानाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचप्रमाणे गेल्या दहा वर्षांपासून पाऊस पडण्याचे प्रमाण घटले आहे. त्यातच तापी-पूर्णा नद्यांचा गाळ काढून खोलीकरण केले जात नाही. जेव्हापासून हतनुर धरण तयार झाले त्या काळापासून तर आजतागायत एकदाही नद्यांच्या पात्रातील गाळ काढला गेला नाही. परिणामी नद्यांचे खोलीकरण न झाल्याने नदीपात्रात पाणी साठवण क्षमतेत घट झाली आहे. त्यामुळे पाण्यापेक्षा गाळाचे प्रमाणच जास्त असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या नदी पात्रांचे खोलीकरण करणे काळाची गरज आहे. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी नदीपात्रात साठविले जाईल. आणि शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचीसुध्दा गरज भागविली जाईल. चांगदेवसह परिसरातील शेती तापी-पूर्णा संगमाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. तापी-पूर्णा नद्यांच्या पाण्यामुळे हा भाग सुजलाम- सुफलाम झालेला आहे. परंतु दिवसेंदिवस भूजल पातळीत घट झाल्याने चिंतेचा विषय बनला आहे. हा परिसर केळी बागायतीसाठी अग्रेसर आहे. केळीला मुबलक प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. सध्याच्या परिस्थितीत तापी नदीच्या जलपातळीत काठापासून सुमारे शंभर ते सव्वाशे मीटर पाण्याची पातळी दूर गेली आहे. परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांनी नदी पात्रावरून शेतीकरिता पाणी उचलले आहे. परंतु नदी पात्रातच कमालीची घट झाल्यामुळे परिसरातील केळी बागा धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहे. 

कपाशी लागवड रखडली 
पाण्याच्या कमतरतेमुळे १५ मे पासून सुरू होणारी बागायती कपाशीची लागवड अद्यापही कुठल्याच शेतकऱ्यांनीच केलेली नाही. ज्यांच्याकडे विहिरी आहे. त्या विहिरींचीसुध्दा भूजल पातळीत घट झालेली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाण्याअभावी केळीला वाचविणे कठीण जात आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे केळीचे घड गळतीचे प्रमाण वाढले आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांना केळी पीक काढून टाकावे लागले आहे. 

पाणीपुरवठ्याच्या विहिरी आटल्या 
दरवर्षीपेक्षा यावर्षी कमी पडलेल्या पावसामुळे चांगदेवला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या जलपातळीत घट झाली आहे. त्यातून पाणीपुरवठा करणे अवघड जात आहे. परिणामी गावातील सधन शेतकरी डॉ.आशिष चौधरी यांनी गावाला पाणी मिळावे, यासाठी सरपंचाच्या विनंतीवरून आपल्या शेतातील विहिरीचे पाणी गावाला पिण्यासाठी दिले आहे. त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या काहीअंशी कमी झाली आहे. परंतु पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे पावले उचलून नवीन विहीर खोदणे गरजेचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com