शिवकालीन मुल्हेर किल्ल्यावरगुढी उभारून केले नववर्षाचे स्वागत

रोशन खैरनार
रविवार, 18 मार्च 2018

शिवकाळात किल्ल्यांना खुप महत्व होते. किल्ले म्हणजे दुसरं घरंच जणू. त्यामुळे गावासोबतच प्रत्येक सण गडावर साजरा केला जायचा. 'आधी तोरण गडावर मग घरावर' महाराजांच्या ह्याच संकल्पनेचा वारसा जोपासत दुर्गवीर प्रतिष्ठान विविध पारंपारिक सण - उत्सव गडकिल्ल्यांवर साजरा करत असते. सोशल मिडीयाच्या विश्वात गुरफटलेल्या तरुणाईने शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचे प्रतिक असलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढे यावे.          
- रोहित जाधव, दुर्गवीर प्रतिष्ठान

सटाणा : बागलाण तालुक्यातील शिवकालीन ऐतिहासिक किल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी आज रविवार (ता.१८) रोजी मुल्हेर (ता.बागलाण) येथील प्राचीन व ऐतिहासिक किल्ल्यावर गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत करत अनोख्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा केला. किल्ल्यावरील सोमेश्वर मंदिरावर उभारलेली गुढी व फडकविलेला भगवा झेंडा याबरोबरच दुर्गवीरच्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा केलेल्या जयघोषामुळे जणूकाही शिवशाही अवतरल्याचेच चित्र होते. 

दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे बागलाण तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक साल्हेर, मुल्हेर या किल्ल्यांसह इतर किल्ल्यांचे नित्यनेमाने संवर्धन केले जात आहे. या गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या गावांमधील आदिवासी बांधवांमध्ये महाराजांच्या गड किल्ले व इतिहासाविषयी प्रेम, आदर व जागृती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी प्रतिष्ठानतर्फे गुढीपाडवा, शिवजयंती, साल्हेर विजय दिन, महाराष्ट्र दिन, दसरा व बलीप्रतिपदा पाडवा आदी पारंपरिक सण - उत्सव किल्ल्यांवरच साजरे केले जातात. नव्या पिढीतील युवकांनाही इतिहासाची प्रेरणा मिळावी यासाठीही प्रतिष्ठान प्रयत्न करीत असते. 

काल शनिवार (ता.१७) रोजी धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिसरातील काही आदिवासी बांधवांसोबत सायंकाळी सात वाजता मुल्हेर किल्ल्यावर चढाईस सुरुवात केली. रात्री आठ वाजता सोमेश्वर मंदिराजवळ येताच सदस्यांनी मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री 'जागर इतिहासाचा' या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक सदस्याने मशालींच्या उजेडात संभाजी महाराजांच्या पराक्रमी लढाया व त्यांचा जाज्वल्य इतिहास आदिवासी बांधवांसमोर कथन करून संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली. रात्रीचा प्रवास करूनही न झोपता पहाटेपर्यँत फुलांच्या माळा व पताका बनविण्यात सारे रमलेले होते. 
यानंतर आज पहाटे दुर्गवीरांनी अभ्यंगस्नान उरकून किल्ल्याच्या उत्तरेकडील दरवाजे व सोमेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. मंदिरावर फुलांच्या माळा व पानांच्या पताकांचा साज चढविण्यात आला. रात्रभर जागून केलेली स्वच्छता आणि तयार केलेल्या माळा पताका संपुर्ण दरवाजावर सजल्यानंतर मंदिराचे रूप अजून बहरले होते. यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेऊन त्याचे पूजन करण्यात आले आणि नववर्षाच्या पहिल्याच दिवशी किल्ल्यावर महाराजांची आरती करण्यात आली. यानंतर मंदिरावर विधिवत गुढी उभारून व भगवा झेंडा फडकविण्यात आला. यावेळी दुर्गवीरच्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज व अडबंगनाथ महाराजांचा जयघोष केल्याने संपूर्ण गडपरिसर दुमदुमून गेला होता. या उपक्रमात प्रतिष्ठानचे रोहित जाधव, विजय शिवदे, पंकज सोनवणे, हेमंत सोनवणे, प्रवीण खैरनार, सागर गरुडकर, सागर सोनवणे, हर्षवर्धन सोनवणे, रोहित सोनवणे, सिद्धेश जाधव, तेजस खैरनार, अब्दुल बोहरी, रोहिदास पवार आदींसह आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला होता.

Web Title: marathi news mulher fort gudhi padwa news