आयुक्तांवरून सोशल मीडियावर "वॉर,समर्थक-विरोधकांच्या फैरी 

residentional photo
residentional photo

नाशिक ः शहरात करयोग्य मूल्यदरवाढीला महासभेने विरोध करून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढ कायम ठेवल्याने त्याविरोधात सत्ताधारी भाजपने आयुक्तांविरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळाले. सोशल मीडियावर आयुक्तांच्या समर्थनार्थ आणि विरोधात तितक्‍याच ताकदीने नेटकरी उतरल्याने आर-पारची लढाई दिसून आली. 

आयुक्त मुंढे यांच्यावर अविश्‍वास ठराव मंजूर करण्यासाठी एक सप्टेंबरला विशेष महासभा बोलाविली आहे. मुंढे यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्यांनी इलेक्‍ट्रॉनिक मीडियावर भूमिका जाहीर केल्याने त्यांच्या समर्थनार्थ नेटकरी मंडळी उतरली. व्हॉटसऍप, फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातून मंगळवारी समर्थनार्थ पोस्ट पडल्यानंतर बुधवारी त्याविरोधात दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

कर्तव्यदक्ष आयुक्त नाशिककरांना नको का? असा सवाल समर्थनार्थ झाल्यानंतर करयोग्य मूल्यदरातील वाढ नाशिककरांचे कंबरडे मोडणारी असून आयुक्तांना त्याचसाठी पाठविले का? असा सवाल करण्यात आला. दिवसभर समर्थक व विरोधकांच्या विविध पोस्ट टाकल्या गेल्याने दिवसभर आयुक्त मुंढे व नगरसेवक चर्चेत राहिले. 

समर्थनार्थ निवेदनांचा पाऊस 
आयुक्त मुंढे यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर समर्थकांनी मोट बांधली असताना दुसरीकडे प्रस्तावाचे समर्थन करणाऱ्या निवेदनांचा अक्षरशः पाऊस पडला. दिवसभरात तब्बल 27 निवेदने महापौर रंजना भानसी यांच्या नावाने दाखल झाले. त्यात करवाढीला प्रचंड विरोध करत आयुक्तांवर हुकूमशाही, एकाधिकारशाहीचा आरोप करण्यात आला. असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सीव्हिल इंजिनिअर्स, प्रभाग 31 मधील नागरिक, महिला पतंजली योग समिती, हॉटेलचालकांच्या आभार संघटना, शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघ, लाइफ मिशन ज्येष्ठ नागरिक संघ, सुवर्णकार समाज संस्था, केबल ऑपरेटर, सेंट्रल गोदावरी कृषक संस्था, सिध्दी विनायक ज्येष्ठ नागरिक संघ, श्री मोदकेश्‍वर सेवा ट्रस्ट, राजसारथी सहकारी गृह निर्माण संस्था, अमृतधारा बहुउद्देशीय गृह निर्माण संस्था, युनिक तनिष्का ग्रुप आदींनी अविश्‍वास प्रस्तावाला समर्थन देत निवेदनातून आयुक्त हटावचा नारा दिला. 

ग्रामीण भागातून प्रस्तावाला समर्थन 
नाशिक रोड, देवळाली, आडगाव, मखमलाबाद, नांदूर-मानूर, सातपूर, अंबड व कामटवाडे, चेहडी बुद्रुक, पिंपळगाव बहुला, पाथर्डी गाव विकास कार्यकारी सोसायटी यांच्यातर्फे विरोधाचे पत्र देण्यात आले. महासभेच्या दिवशी नगरसेवकांच्या समर्थनार्थ मोर्चाचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. फेरीवाला संघटना महासभेवर अविश्‍वास प्रस्तावाच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com