'शेतकर्‍यांच्या लेकीही' चक्काजाम आंदोलन करणार

हरिभाऊ दिघे
रविवार, 20 ऑगस्ट 2017

घारगाव येथे मंगळवारी चक्काजाम; शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफीची मागणी

तळेगाव दिघे (जि. नगर) : शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी तसेच त्यांच्या मुला - मुलींना शैक्षणिक सवलती, शैक्षणिक कर्ज माफी मिळावी या मागणीसाठी मंगळवारी (२२ ऑगस्ट) रोजी सकाळी ९ वाजता पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर घारगाव (ता. संगमनेर) येथे शेतकर्‍यांच्या लेकी चक्काजाम आंदोलन करणार आहेत. 

शेती व्यवसाय बेभरवशाचा बनल्याने शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. शेतकर्‍यांच्या मुलांना शैक्षणिक कर्जमाफी, बिनव्याजी कर्ज, विविध शैक्षणिक सुविधा, इयत्ता दहावीपर्यंत मुलींना विनाअनुदानितमध्ये मोफत शिक्षण, स्पर्धा परिक्षा व विविध भरतींसाठी विद्यार्थ्यांना एसटी भाडे सवलत, तेथे राहण्याची सुविधा, प्रकल्पग्रस्तांना वेळेत दाखले मिळणे यासह शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी, मुलींना विशेष सवलती यासाठी सदर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

संगमनेर पंचायत समिती सदस्या प्रियंका गडगे या आंदोलनचे नेतृत्व करणार आहेत. मंगळवारी होणार्‍या शेतकर्‍यांच्या लेकींच्या चाक्क्जाम आंदोलनात महिला, भगीनी व विद्यार्थी - विद्यार्थिनींनी सहभागी व्हावे, असे आवाहन 'आम्ही शेतकर्‍यांच्या लेकी' आभियानच्या  सदस्य कार्यकर्त्यांनी केले आहे.

ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: marathi news nagar news farmers daughters chakka jam