नगर, जळगावात सर्वाधिक अवैध शस्त्रास्त्रे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

नाशिक : गेल्या महिन्यात नाशिक पोलीस परिक्षेत्रातील अहमदनगर शहर गुन्हेगारी घटनांनी होरपळून निघालेले असताना शहराची कायदा व सुव्यवस्थाही धोक्‍यात आली होती. वाढती गुन्हेगारी आणि गल्लीबोळातील संशयितांच्या हाती गावठी कट्ट्यांपासून धारदार शस्त्रास्त्रे याकाळात पाहावयास मिळाल्याने पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड सुरू केली.

नाशिक : गेल्या महिन्यात नाशिक पोलीस परिक्षेत्रातील अहमदनगर शहर गुन्हेगारी घटनांनी होरपळून निघालेले असताना शहराची कायदा व सुव्यवस्थाही धोक्‍यात आली होती. वाढती गुन्हेगारी आणि गल्लीबोळातील संशयितांच्या हाती गावठी कट्ट्यांपासून धारदार शस्त्रास्त्रे याकाळात पाहावयास मिळाल्याने पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड सुरू केली.

 परिक्षेत्रातील जळगावात सर्वाधिक अवैध शस्त्रास्त्रे अन्‌ गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळल्या तर त्याखालोखाल नेहमी धुमसणाऱ्या अहमदनगरमध्ये अवैध शस्त्रास्त्रे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये 10 पिस्तुल, 19 गावठी कट्ट्यांसह 93 अवैध हत्यारे हस्तगत केली आहेत.

दरम्यान, नगरमधील घटनांमुळे अवैध हत्यारांची माहिती मिळविण्यासाठी 25 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करण्याची नामुष्कीही पोलिसांवर ओढावली होती. 
नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगरमध्ये गेल्या महिन्यात राजकीय पूर्ववैमनस्यातून रक्तरंजित घटना घडल्या. त्यामुळे नगरची कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात आली. गुन्हेगारांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करेपर्यंत मजल पोहोचली होती.  पोलिसांसमोर गुन्हेगारी मोडीत काढण्याचे मोठे आव्हान जसे उभे राहिले तसे अवैध हत्यारांविरोधात कारवाई गरजेची होती. त्यानुसार, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी पाचही जिल्ह्यांमध्ये अवैध हत्यारांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश बजावले होते. 
गेल्या दहा दिवसांमध्ये पाचही जिल्ह्यांमध्ये अवैध हत्यारांविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये सर्वाधिक 26 गुन्हे जळगावमध्ये नोंदले गेले असून शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी 36 गुन्हेगारांकडून पिस्तुले, गावठी कट्टयांसह तलवारी अशी हत्यारे जप्त करीत गुन्हे दाखल केले. अहमदनगरमध्ये 18 गुन्हयात 32 जणांना अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये 11 गुन्ह्यांमध्ये 11, धुळ्यातही 11 गुन्ह्यांमध्ये 11 तर नंदूरबारमध्ये 3 गुन्ह्यात चौघांना अटक केली आहे. 

परिक्षेत्रात हस्तगत हत्यारे 
जळगाव : 36 गुन्हेगार : 3 पिस्तुल, 4 गावठी कट्टे, 29 काडतुसे, 13 तलवारी, 2 कोयते, 4 चॉपर, 1 सुरा, 1 कुऱ्हाड. 
अहमदनगर : 32 गुन्हेगार : 4 पिस्तुल, 5 गावठी कट्टे, 13 काडतुसे, 10 तलवारी, 2 चाकू 
नाशिक (ग्रामीण) : 11 गुन्हेगार : 3 गावठी कट्टे, 2 काडतुसे, 9 तलवारी, 2 कोयते, 3 चाकू 
धुळे : 11 गुन्हेगार : 7 गावठी कट्टे, 1 पिस्तुल, 10 काडतुसे, 8 तलवारी, 1 सुरा, कटर, गुप्ती 
नंदूाबार : 4 गुन्हेगार : 2 पिस्तुल, 4 तलवारी 

परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यात करण्यात आलेल्या कारवाईतून 94 गुन्हेगारांना अटक झाली. तर, 10 पिस्तुल, 19 गावठी कट्टे, 54 काडतुसे, 45 तलवारी, 4 कोयते, 4 चॉपर, 5 चाकू, 2 सुरे, कटर, कुऱ्हाड, गुप्ती, एक डबर बोर बंदूकीसह 4 वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याचे 69 गुन्हे दाखल झाले आहेत. 

परिक्षेत्रातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तरीही संशयितांची माहिती आपआपल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल आणि 25 हजार रुपयांचे बक्षिसही दिले जाईल. 
- विनयकुमार चौबे, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र. 

Web Title: MARATHI NEWS NAGER,JALGAON WAPENS