esakal | नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या प्रवेशप्रक्रियेस मान्यता- डॉ. गावित 
sakal

बोलून बातमी शोधा

नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या प्रवेशप्रक्रियेस मान्यता- डॉ. गावित 

शासनाने चार मेडिकल कॉलेजांना मंजुरी दिली होती. त्यात नंदुरबार कॉलेजचा समावेश होता. शंभर विद्यार्थी क्षमतेचे हे कॉलेज आहे.

नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या प्रवेशप्रक्रियेस मान्यता- डॉ. गावित 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार ः येथील वैद्यकीय महाविद्यालयास शंभर विद्यार्थी क्षमतेच्‍या प्रवेशप्रक्रियेस राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रारंभ होणार आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. अखेर अनेक अडथळे पार करीत जिल्ह्याच्‍या विकासातील महत्त्वाचा माइलस्टोनपैकी एक ॲचिव्ह होऊन स्वप्नपूर्ती होत असल्याचा आनंद झाला आहे, अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. 

वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रवेशप्रक्रियेस केंद्रीय समितीने मंजुरी दिल्यामुळे डॉ. गावित व खासदार हीना गावित यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. गावित म्हणाले, की २१ जानेवारी २०१२ ला शासनाने चार मेडिकल कॉलेजांना मंजुरी दिली होती. त्यात नंदुरबार कॉलेजचा समावेश होता. शंभर विद्यार्थी क्षमतेचे हे कॉलेज आहे. दुदैवाने काही तांत्रिक अडचणींमुळे ते लवकर सुरू होऊ शकले नाही. मागील युती शासनाच्या काळात नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला यश आले नाही. खासदार डॉ. हीना गावित यांनी केंद्र व राज्य शासनाला जिल्ह्यातील कुपोषण, आरोग्याच्या प्रश्नांबाबत माहिती पटवून दिली व वेळोवेळी याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्याने कामाला चालना मिळाली.

केंद्राचे ६० टक्के (१९५ कोटी) व राज्य शासनाचे ४० टक्के (१३० कोटी) निधी मंजूर झाला. त्यानंतर केंद्र शासनाचा निधी प्राप्त झाला. राज्याने डीपीडीसीतून तीन कोटी मंजूर केले. त्यापैकी एक कोटी ५३ लाख निधी प्राप्त झाल्याने त्यातून विविध साहित्य खरेदी केले. केंद्र शासनाने राज्य शासनाला २०२०-२१ मध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत विचारणा केली. राज्याचे आरोग्यमंत्री अमित देशमुख यांनीही तत्‍काळ हमीपत्र दिले. त्यानंतर त्रिसदस्य समिती आली. त्या समितीने पाहणी करून तसा अहवाल दिला. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी तत्काळ मंजुरी दिली. त्यानुसार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने २०२०-२१ पासून शंभर विद्यार्थ्यांचा प्रवेशप्रक्रियेस मंजुरी दिली आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज झाली आहे. महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवाजी सुप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिनियुक्तीवर कर्मचारी, डॉक्टर, प्राध्यापक उपलब्ध झाले आहेत. 


जिल्‍हा रुग्णालय महाविद्यालयाकडे वर्ग 
खासदार हीना गावित म्हणाल्या, की एनएमसी समितीने तपासणी केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी प्राधान्याने नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मान्यता दिली. तसे पत्र मला प्राप्त झाले आहे. जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग केले आहे. यामुळे आतच्या नीट निकालातील विद्यार्थ्यांना नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल. दोन वर्षांत जिल्ह्यातील आरोग्याचे प्रश्न संपणार आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे