नांदगाव आगाराकडून ग्रामीण विद्यार्थ्यांची हेळसांड 

nandagaon
nandagaon

नांदगाव : तालुक्यातील हिसवळ बुद्रुकला बसथांब्यावर बससाठी ताटकळत असलेल्या विद्यार्थ्यांनी हात दाखवून ही बस थांबविली नसल्याचा उद्दामपणा मनमाड आगारातील वाहकचालकाने केल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी रास्तारोको केला. 

तालुक्यातील ढेपाळलेल्या परिवहन महामंडळाच्या आगाराच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ एका महिन्याच्या अंतरातील हा तिसऱ्यांदा रास्तारोको झाल्याने परिवहन विभागाच्या उच्चस्तरीय प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागातून नांदगाव शहरात विविध माध्यमातील शिक्षणासाठी मोठ्या संख्यने येणाऱ्या विद्यार्थ्यांची अशा रितीने होत असलेली शैक्षणिक हेळसांड थांबणार कधी असा सवाल ग्रामीण भागातील पालक विचारू लागले आहेत. ८ डिसेंबर रोजी पिंप्राळे येथील विध्यार्थ्यानी बससाठी रास्तारोको आंदोलन केले.

त्यांनतर पुन्हा १९ डिसेंबरला शहरातील शनिमंदिरच्या बसथांब्यावर विद्यार्थ्यांनी केलेले रास्तारोको आंदोलन चांगलेच गाजले होते. या दोन आंदोलनातून तालुक्यातील परिवहन महामंडळच्या प्रशासनाने कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नसल्याचा प्रत्यय आज हिसवळ बुद्रुकच्या रास्तारोको आंदोलनाने आला. सकाळी साडेनऊ वाजेपासून रस्त्यावरील बसस्थानकावर मोठ्या संख्येने विद्यार्थी उभे होते. 

मात्र, याच काळात नांदगावच्या दिशेने ब्राम्हणवाडाहून आलेली नांदगाव आगाराची बस आली. या बसमध्ये विद्यार्थ्यांना चढण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे काही विद्यार्थी खाली राहिले, त्यांनतर मनमाड आगाराची बस नांदगावच्या दिशेने आली. मात्र, मनमाड आगारातील चालक-वाहकाने बस थांबविण्याऐवजी ही बस पुढे नेली.

मनमाड आगारातील बस नेहमीच विद्यार्थ्यांना घेत नसल्याचा अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांनी मग आपला रौद्रावतार दाखविला. त्यांनतर संतप्त विद्यार्थ्यांनी भाबलीचे झुडुपे आणून रास्ता रोको सुरु केले. या रास्तारोको मुले राज्यमार्गावर दुतर्फा वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास तासभर हे आंदोलन सुरु होते.

आगारप्रमुख बेलदार रजेवर असल्याने त्यांनी प्रभारी असलेल्या एस एन पाटील यांना अतिरिक्त बस पाठविण्याची सूचना केली. या सूचनेनुसार पाटील यांनी हिसवळच्या दिशेने बस सोडली.

दरम्यान, रास्तारोकोची दाखल घेत नांदगावहून पोलिसांची कुमुक दाखल झाली. मात्र, आंदोलनकर्ते विद्यार्थी असल्याचे बघितल्यावर पोलिस नायक पंकज देवकथे यांनी बस स्थानकातील नियंत्रकांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. सरपंच विजय आहेर, सुरेश आहेर, नीलकंठ आहेर, दशरथ आहेर, बाजीराव आहेर यांनीही घटनास्थळी धाव घेत संतप्त विद्यार्थ्यांची समजूत काढली. बसमध्ये बसून विद्यार्थी नांदगावच्या दिशेने रवाना झाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com