esakal | नंदुरबार जिल्ह्यांतर्गत बससेवेस शुक्रवार पासून प्सुरू होणार !
sakal

बोलून बातमी शोधा

नंदुरबार जिल्ह्यांतर्गत बससेवेस शुक्रवार पासून प्सुरू होणार !

आंतरजिल्हा बससेवेबाबत शासनाकडून सूचना आल्यानंतर त्यानुसार स्वतंत्र आदेश काढण्यात येतील. औषधांची दुकाने आणि खाजगी रुग्णालये सुरू राहतील.

नंदुरबार जिल्ह्यांतर्गत बससेवेस शुक्रवार पासून प्सुरू होणार !

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नंदुरबार  : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यात एकही कोविड संसर्ग रुग्ण नसल्याने २२ मे पासून जिल्ह्यांतर्गत ५० टक्के प्रवासी क्षमतेने बससेवा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. ग्रामीण भागातील जनतेला या सुविधेचा लाभ होणार आहे.तसेच व्यावसायिकांची दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत सलग सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र नियम व अटी कायम लागू राहणार आहेत. 

आंतरजिल्हा बससेवेबाबत शासनाकडून सूचना आल्यानंतर त्यानुसार स्वतंत्र आदेश काढण्यात येतील. औषधांची दुकाने आणि खाजगी रुग्णालये सुरू राहतील. टॅक्सी, कॅब आणि रिक्शा सुरू राहतील, तथापि केवळ वाहनचालक आणि इतर दोन प्रवासी नेण्यास अनुमती राहील. चारचाकी वाहनाने देखील वाहनचालक व इतर दोन प्रवाशांना अनुमती असेल. दुचाकी वाहनावर केवळ चालकाला (एका व्यक्तीस) अनुमती असेल. सर्व प्रकारच्या मालवाहतूक करता येईल. शहरी आणि ग्रामीण भागातील उद्योग सुरू करण्यासदेखील अनुमती असेल. 


सेवा -सुविधा सुरू होणार 
शहरातील सर्व दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, जीवनावश्यक वस्तूंसाठीची ई-कॉमर्स सेवा, खाजगी कार्यालये, शेती संदर्भातील कामे, बँक, कुरिअर आणि डाक सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, घरपोच सेवा देणारे हॉटेल्स, उपनिबंधक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालये सुरू ठेवण्यास अनुमती असेल. शासकीय कार्यालयात १०० टक्के उपस्थिती ठेवता येईल. प्रेक्षकाशिवाय वैयक्तिक व्यायामासाठी क्रीडांगणे सुरू ठेवण्यासही अनुमती राहील. मात्र समुह किंवा गट यांना अनुमती नसेल, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. 

व्यावसायिकांना ९ ते ५ ची वेळ 
सर्व प्रकारची दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहतील. शासकीय प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या अनुज्ञतेसाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार नाही. दुकान मालकांनी कोरोनाविषयक सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा मान्यता रद्द होईल. हॉटेलमधील पार्सल सेवेलाच केवळ अनुमती असेल. 

यांनी आहे बंदी 
रेल्वे, आंतरराज्य बससेवा, आंतरजिल्हा बससेवा, शॉपींग मॉल्स, चित्रपटगृहे, प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार आणि ऑडीटोरीअम, असेंम्ब्ली हॉल पूर्वीप्रमाणे बंद राहतील. जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, ऊरूस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, आठवडे बाजार भरण्यास बंदी असणार आहे. धार्मिक कारणासाठी एकत्र होण्यासही बंदी असेल. 

सायंकाळी सातनंतर संचारबंदी 
जिल्ह्यात सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही नागरिकास आवश्यक बाब वगळता इतर कारणासाठी बाहेर फिरण्यास बंदी असेल. ज्येष्ठ नागरिक, १० वर्षाखालील मुले आणि गर्भवती महिलांना बाहेर फिरण्यास अनुमती राहणार नाही. केवळ आरोग्यविषयक कारणांसाठी त्यांना बाहेर निघता येईल. प्रतिबंधित क्षेत्रात केवळ मालवाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.