सातपुड्यात निनादणार होळीचे ढोल; होलिकोत्सवाला आजपासून सुरवात   

nandurbar aadivasi holi
nandurbar aadivasi holi

नंदुरबार : आदिवासी संस्कृती व ऐक्याचे दर्शन घडविणाऱ्या होलिकोत्सवाचे ढोल व बिरीचा आवाज उद्यापासून सातपुड्याच्या कुशीत गुंजणार आहे. आदिवासी बांधवांच्या राजवाडी होळीसह भोंगऱ्या बाजाराची ख्याती सर्वांनाच भुरळ घालणारी आहे. सातपुड्यात गेल्या पंधरा दिवसांपासून होळीचे वेध लागले असून स्थानिक जनतेसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व इतर शहरात स्थायिकांचीही उत्सुकता वाढली आहे. या सणानिमित्त येणाऱ्या हजारो नागरिकांच्या स्वागतासाठी स्थानिक आदिवासी बांधव सज्ज झाले आहेत. हा उत्सव आनंदाने, उत्साहाने आणि शांततेत पार पडावा म्हणून प्रशासन व पोलिस यंत्रणेचीही तयारी पूर्ण झाली आहे. 

होलिकोत्सव हा केवळ आदिवासी समाजासाठीच नव्हे तर राज्यातील मेगा सिटीत राहणाऱ्या नागरिकांसाठीही एक उत्सुकता आणि आनंदाचा क्षण असतो. दरवर्षी या सणाला हजेरी लावणाऱ्या मुंबई व पुणेकरांची गर्दी वाढत आहे. वर्षभर सातपुड्याच्या कुशीतील नागरीक रोजगार अथवा नोकरी, व्यवसायानिमित्त कुठेही असला तरी होळीसाठी गावी येण्यास प्रथम प्राधान्य दिले जाते. रोजगारासाठी स्थलांतर केलेले मजूर गावात दाखल झाले आहेत. नोकरवर्गही आपल्या कुटुंबासह होळीसाठी आठवडाभराची सुटी घेत गावाकडे येऊ लागला आहे. शाळांना होळीनिमत्त विशेष सुटी जाहीर झाली आहे. 
 
पुनर्वसन वसाहतीत स्पर्धांची धूम 
आमलाड ः रोझवा व गोपाळनगर पुनर्वसन वसाहतींमध्ये होळीनिमित्त विविध नृत्य स्पर्धा होणार आहेत. त्या स्पर्धांसाठी आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे होळी सणाची रंगत वाढणार आहे. त्यादृष्टीने नियोजन व तयारी सुरू आहे. जीवननगर (गोपाळनगर) पुनर्वसन वसाहत येथे राजवाडी होळीनिमित्त विविध स्पर्धा वादन, वेशभूषा व नृत्य यांच्या स्पर्धा नऊ मार्चला सायंकाळी सात ते दुसऱ्या दिवशी सकाळी सातपर्यंत स्पर्धा रंगणार आहेत. 
 
आकर्षक बक्षिसांमुळे रंगत 
गळ्यातील ढोलसाठी प्रथम बक्षीस पाच हजार एक, द्वितीय तीन हजार एक रुपये, तृतीय दोन हजार एक रुपये असेल. खुर्चीवाले ढोलसाठी प्रथम तीन हजार एक रुपये, द्वितीय दोन हजार एक रुपये, तृतीय एक हजार एक रुपये असेल. बुवा-बुध्या स्पर्धा प्रथम आठ हजार एक रुपये, द्वितीय पाच हजार एक रुपये, तृतीय तीन हजार एक रुपये, गेर नृत्य स्पर्धा प्रथम आठ हजार एक रुपये, द्वितीय पाच हजार एक रुपये, तृतीय तीन हजार एक रुपये बक्षीसे जाहीर करण्यात आले आहेत. 
 
आदिवासी नृत्य स्पर्धा 
रोझवा पुनर्वसन वसाहतीमध्ये होळीनिमित्त सात मार्चला आदिवासी पारंपरिक समूह नृत्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी प्रथम बक्षिस तीन हजार एक रुपये, द्वितीय दोन हजार एक ,तृतीय पंधराशे एक रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक बाज्या वसावे,जोरदार पावरा,राड्या वसावे, रेवजी वसावे,दाजी पाडवी,रमेश वसावे, दशरथ तडवी, नोवा वसावे यांनी केले आहे. उत्सुकांनी आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 
 
दाब येथील होळीचा मान 
सातपुड्यात उद्यापासून (ता.५) होळीच्या उत्सवाला सुरवात होईल. दाब (ता. अक्कलकुवा) येथील आदिवासी कुलदेवता याहामोगी मातेचे दाब हे राजपाठा गाठा ठाकूर यांचा नावाने ओळखले जाते. सातपुड्यातील पहिल्या होळीचा त्यांना दिला जातो. त्यानंतर इतर ठिकणच्या होळींना सुरवात होते. 
 
अशा असतील सातपुड्यातील होळी 
५ मार्च ः दाब (ता. अक्कलकुवा) 
६ मार्च ः गोरबा, काकरपाटी, खामला (ता. अक्कलकुवा) व कालिबेल (ता.तळोदा) 
७ मार्च ः खुंटामोडी (ता. धडगाव) 
८ मार्च ः कालिबेल (ता. धडगाव) 
९ मार्च ः काठी (ता. अक्कलकुवा), मांडवी, सुरवाणी (ता. धडगाव) 
१० मार्च ःमोलगी (ता. अक्कलकुवा),काकडदा (ता. धडगाव) 
११ मार्च ः असली, राजबडी (ता. धडगाव) व जामली (ता. अक्कलकुवा) 
१२ मार्च ः धनोज (ता. धडगाव), जमाना (त. अक्कलकुवा) 
१३ मार्च ः बुगवाडा, वरखेडी (ता. धडगाव) 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com