"बांधावर खत' योजना फोल 

धनराज माळी
Friday, 3 July 2020

योग्य वेळी खतांची मात्रा दिल्यास पिकाची निकोप वाढ होऊन उत्पादनही भरघोस येते. कंपन्यांनी शेतकऱ्यांना खते वापरण्याची सवय लावली आहे. आता खत वेळेवर मिळत नसेल, तर कंपन्यांकडून होणारी टंचाई आहे की व्यापाऱ्यांचा काळा बाजार हेच कळणे कठीण झाले आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 
-लक्ष्मण पाडवी, प्रगतिशील शेतकरी, राजापूर, ता. नंदुरबार

नंदुरबार : शेतकऱ्यांची पिके वाऱ्यावर डोलू लागली असून, त्यांची वाढ होण्याबरोबरच पीक निकोप राहण्यासाठी पिकांना विविध खतांची मात्रा दिली जाते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने "शेतकऱ्यांचा बांधावर खते-बियाणे पुरविण्याचे' जाहीर केले होते. मात्र जिल्ह्यात आता पिकांना खते देण्याच्या वेळीच खतांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाची बांधापर्यंत खत पोचविण्याची योजना फोल ठरली आहे. खत विक्रेते त्यांचे कायमचे ग्राहक असलेल्यांनाही खते देत नसून ही टंचाई खरी की कृत्रिम, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे सर्व काही हिरावून बसलेला शेतकरी या वर्षी मोठ्या उमेदीने खरिपासाठी सज्ज झाला आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शहादा-तळोदा तालुक्‍यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतशिवार जलमय झाले. मे महिन्यात लागवड केलेल्या कापसासह पपईलाही हा पाऊस लाभदायक ठरला. मात्र वादळवाऱ्यामुळे पावणेदोन कोटींचे नुकसान या पावसाने केले. त्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यांची पिके बऱ्यापैकी डोलू लागली आहेत. 

ऐनवेळी टंचाई 
महिनाभरापूर्वी विक्रेत्यांकडे खते उपलब्ध होती. मात्र आता पिकांना खत देण्याची वेळ येताच यूरियाची टंचाई निर्माण झाली. यूरियाअभावी पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे पिकांची वाढ खुंटू शकते. शेतकरी खतांसाठी विक्रेत्यांकडे चकरा मारत आहेत. मात्र खते मिळत नसल्याचे चित्र आहे. काही खते उपलब्ध आहेत, ज्यांची आता पिकांना गरज नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचे चित्र आहे. 

कृषी विभागाकडून दुर्लक्ष 
एकीकडे कृषी विभाग शेतकऱ्यांना बांधापर्यंत खते पोचविण्याचे जाहीर करते, तर दुसरीकडे खते उपलब्ध होत नाहीत म्हणून त्रयस्थ झालेले शेतकरी कृषी विभागाच्या कार्यालयात गेल्यावर योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच काही सामाजिक संघटनाही संतप्त झाल्या आहेत. 

कृषिमंत्र्यांकडूनही बेदखल 
अक्कलकुवा तालुका आदिवासी टायगर सेनेतर्फे शेतकऱ्यांचे खतासाठी होत असलेले हाल पाहिले गेले नाहीत. त्यामुळे या संघटनेने थेट कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन सादर करून खते उपलब्ध करून देण्याची मागणी मागील आठवड्यात केली होती. मात्र अद्यापही त्यांच्याकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar agree culture farm fartilaiser scheme