अक्कलकुवा सीमेलगत सन्नाटा! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

शेजारील गुजरात राज्यात आपल्या शहाराच्या सीमेलगतच ‘कोराना’चे रुग्ण आढळून आल्याने शहरवासीयांनी सतर्क राहून स्वतःची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून, घरातच राहा, सुरक्षित राहावे. 
- राजेश्वरी इंद्रवदन वळवी, सरपंच, अक्कलकुवा 

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्याच्या सीमेलगत गुजरातमधील गावांमध्ये ‘कोरोना’चे रुग्ण आढळल्याने प्रशासनाबरोबरच नागरिकही सावध झाले आहेत. ‘ग्रीन झोन’मध्ये असल्याने सुटकेचा निःश्‍वास सोडलेले प्रशासन खाडकन जागे झाले. अंकलेश्‍वर- बऱ्हाणपूर महामार्गावरील गुजरातच्या सीमेलगत असलेल्या गावांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. दरम्यान, गुजरातमधील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून वडफळी व आंबाबारी (ता. अक्कलकुवा) येथील सहा जणांना आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांना नंदुरबार येथे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. 

Image may contain: outdoor
जिल्ह्यातील अक्कलकुवा हा गुजरात- मध्य प्रदेशला जोडणारा अंकलेश्‍वर- बऱ्हाणपूर महामार्गावरील तालुका आहे. या तालुक्याचे शेवटचे टोक गुजरातच्या सीमेलगत आहे. खापरपासून अवघ्या १२ किलोमीटरवर सेलंबा व डेडियापाडा ही गुजरातमधील मोठी गावे आहेत. सेलंबाचाच एक भाग असलेल्या कुयदा या गावात ‘कोरोना’चा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली. प्रशासनाने तत्काळ गुजरातच्या सीमेवरील गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक केल्या. सीमा तपासणी नाके बंद करण्यात आले आहेत. ग्रामसुरक्षा दलांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 
 
सात जणांना ‘क्वारंटाइन’ 
गुजरातमधील रुग्णाच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून वडफळी येथील चार व आंबाबारी येथील तीन, अशा सात जणांना आरोग्य विभागाने गावातून ताब्यात घेतले आहे. त्यापैकी चौघांना रात्रीच नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. तिघांना आज सकाळी आणण्यात आले. सातही जणांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या ‘स्वॅब’चे नमुने घेण्यात आले आहेत. नमुने पुढील तपासणीसाठी धुळ्याला पाठविले आहेत. या सातही जणांना जिल्हा रुग्णालयाच्या ‘क्वारंटाइन कक्षा’त ठेवण्यात आले आहे. 
 
खापरला कडकडीत बंद 
खापर : सीमेलगत ‘कोरोना’चा रुग्ण आढळल्याने खापरच्या ग्रामस्थांनी तत्काळ आजपासून तीन दिवस गाव पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. स्वयंघोषित ‘जनता कर्फ्यू’ लागू केला आहे. स्वयंस्फूर्तीने ग्रामस्थांनी सहभाग नोंदवत कडकडीत बंद पाळला आहे. गावातील मुख्य गल्ल्या काटेरी झुडपे टाकून बंद करण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी युवक तैनात आहेत. पोलिसांचाही खडा पहारा आहे. गावातील कोणीही बाहेर जाणार नाही व गावात बाहेरचा कोणीही येणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. 
 

अक्कलकुवा आज, उद्या ‘जनता कर्फ्यू’ 
वाण्याविहीर : अक्कलकुवा शहरातही १८ व १९ एप्रिलला ‘जनता कर्फ्यू’ बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. याबाबत सरपंच राजेश्वरी वळवी यांनी तातडीची बैठक बोलावली होती. गुजरातमधील सेलंबा येथे ‘कोरोना’चे रुग्ण आढळून आल्याने सीमेवरील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. सरपंच वळवी यांनी शहरातील सर्व नागरिकांनी दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असे आवाहन केले. शेजारील गुजरात राज्यात आपल्या सीमेलगतच ‘कोराना’चे रुग्ण आढळून आल्याने शहरवासीयांनी सतर्क राहून स्वतःची काळजी घ्यावी, तिकडून कुणी येण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, असे सरपंच राजेश्वरी वळवी यांनी म्हटले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar akkalkuwa border carfyu corona one possitive case