जखमी झाल्यानंतर बेवारस रस्त्यावरच सोडून दिले; आता जगण्याची लढाई लढतोय एकटाच

camel injured
camel injured

तळोदा (नंदुरबार) : 'सुख के सब साथी, दुखमें ना कोई' या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव पायाने अधू झाल्यामुळे स्वतःच्या मालकाने तळोदयातच सोडून दिलेल्या असहाय्य उंटा बाबत घडलेल्या घटनेवरून येत आहे. काळाचा ओघात 'त्या' उंटाच्या पायाची जखमही बरी होत आहे, मात्र वाळवंटात, कळपात राहायला सरावलेला उंट प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाविना एकटा पडला आहे. विचित्र, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत हा उंट एकटाच भटकत असून एखादी सामाजिक संघटना, प्राणी मित्र अथवा प्रशासन किंवा वन विभागाने पुढे येत योग्य ठिकाणी पोहचवतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

जून महिन्याच्या सुरुवातीला उंट बाळगणारे कुटुंब उंटाचा कळपासह दोन दिवस शहरातील चिनोदा रस्त्यालगतचा परिसरात मुक्कामी होते. त्यानंतर ते कुटुंब ६ जूनच्या सकाळी आपल्या सर्व उंटांसह अक्कलकुवा रस्त्याच्या दिशेने निघून गेले. मात्र त्यावेळी त्या कुटुंबाने पायाने अधू झालेल्या एका गंभीर जखमी उंटाला तेथेच सोडून दिले होते. त्यावेळी त्याच परिसरात शेत असलेले शिरीष सोनेरी यांनी त्या उंटाला मालकापर्यंत पोहचविण्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते. त्यांनी सदर माहिती तळोदा पोलीस स्टेशनला कळवली होती आणि एका पोलिस कर्मचाऱ्यासह ते स्वतः अक्कलकुवा पर्यंत उंटाचा कळपाला शोधण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना उंटाचे कळप कोठेच दिसून आले नव्हते. त्यानंतर शिरीष सोनेरी, पत्रकार फुंदीलाल माळी, सुशील सूर्यवंशी व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वास नवले यांनी दुसऱ्या दिवशी उंटावर प्रथमोपचार केले होते. 

'तो' एकटाच लढतोय जगण्याची लढाई
जून महिन्यांपासून म्हणजेच तब्बल ५ महिन्यांपासून तो उंट त्याच परिसरात भटकंती करत असून परिसरातील पाला - पाचोळा खात आपले कुटुंब, कळपाविना कसाबसा एकटाच आपले जीवन जगत आहे. काळाचा ओघात त्या उंटाच्या पायाची जखम जरी बरी झालेली असली तरी आता मात्र त्या उंटाला प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत एकटेच राहण्याची दुर्दैवी वेळ ओढवली आहे. एखादी सामाजिक संघटना - प्राणी मित्र अथवा प्रशासन अथवा वन विभागाने पुढे येत आपल्याला योग्य ठिकाणी नेऊन सोडतील, अशी भाबडी अपेक्षा उराशी बाळगून तो उंट जणू काय एकटाच जगण्याची लढाई लढतो आहे. 

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे 
संपूर्ण आयुष्य आपल्या मालकाचे ओझे वाहणाऱ्या 'त्या' वाळवंटातील जहाजाचे पाय अधू झाल्याने, त्याच्या मालकाने ओझे समजून त्या उंटाला एकटेच सोडून दिले. त्यामुळे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे कशासाठी उतरावे तंबू ठोकून कोण मेले कुणासाठी रक्त ओकून? हे सामना चित्रपटातील कवी आरती प्रभू यांचे हे गीत सदर परिस्थितीवर अतिशय चपखल बसत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com