नंदुरबार बांधकाम विभागातील बडा मासा लाचेच्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

मंजुरी करताना अडीच टक्क्यांप्रमाणे एक लाख पाच हजाराची रक्कम अभियंता जगदाळे यांनी मागितली होती. त्यापोटी वीस हजार रूपये आधी दिलेही होते. उरव्रति रक्कम आज देण्याचे ठरले होते.

नंदुरबार :  येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी अभियंता बबन जगदाळे यास ठेकेदाराकडून ४४ लाखांच्या बिलांच्या मंजुरीपोटी अडीच टक्क्याप्रमाणे एक लाख पाच हजारापैकी ८५ हजाराची लाच स्वीकारताना आज रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेने पंचायत समितीत प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान बांधकाम विभागातील या टक्केवारीने बेधुंद कारभार पुन्हा उघड झाला आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार एका बांधकाम ठेकेदाराने जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत पिपंरीपाडा (ता. नंदुरबार) येथे रस्त्यावर स्लॅब ड्रेन (पूल) तसेच जिल्हा परिषद दुरुस्तीचे कामे व पंचायत समितीच्या दुरुस्तीच्या कामांचे ठेके घेऊन कामे पूर्ण केले आहेत. त्याची ४४ लाखांचे बिल मंजूर होऊन रक्कम ठेकेदाराला मिळाली आहे. मात्र ही मंजुरी करताना अडीच टक्क्यांप्रमाणे एक लाख पाच हजाराची रक्कम अभियंता जगदाळे यांनी मागितली होती. त्यापोटी वीस हजार रूपये आधी दिलेही होते. उरव्रति रक्कम आज देण्याचे ठरले होते. उर्वरित ८५ हजार रूपये देण्य़ाची ठेकेदाराची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क केला होता. पडताळणीअंती विभागाने आज सापळा लावला होता. विभागाचे उपअधिक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल अहिरराव, उत्तम महाजन, संजय गुमाने, दीपक चित्ते, अमोल मराठे, संदीप नावाडेकर, ज्योती पाटील, मनोज अहिरे यांनी सापळा रचला. त्यानुसार ठेकेदाराने आज दुपारी पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील बबन जगदाळे यांच्या कार्यालयात ८५ हजाराची लाच दिली, त्याचवेळी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar construction department officer anty corption trape