पावसाचे पाणी शेतात...चक्‍क ट्रॅक्‍टरने उपसा

धनराज माळी
Monday, 24 August 2020

गेल्या वर्षी बिगरमोसमी व अतिवृष्टीमुळे तयार झालेली पिके शेतातच कुजली. यंदा सुरवातीस कमी पाऊस झाला. मात्र आता पिके निघण्याची वेळ आली, तर संततधार सुरू आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. 
– मधुकर पाटील, शेतकरी, नंदुरबार

नंदुरबार : पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू असल्याने काढणीवर आलेली पिके धोक्यात सापडली आहेत. काही ठिकाणी शेतांना जलाशयाचे स्वरूप पाप्त झाले आहे. यामुळे पिके पिवळी पडली आहेत. काही पिके अतिपावसामुळे कोमेजली आहेत. मुगाला कोंब फुटले आहेत. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकरी शेतातील साचलेले पाणी ट्रॅक्टरच्या पंपाने बाहेर काढत आहे. 
जिल्ह्यात श्रावणाला सुरवता झाल्यापासून श्रावणसरी सुरू होत्या. त्यानंतर पंधरा दिवसांपासून जोरदार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे सततच्या पावसाने धरणे भरली. त्यासोबतच शेतात जलाशय निर्माण झाले. शेतात साचलेले पाणी बाहेर निघेना व वरून पाऊस काही थांबेना, असे चित्र जिल्हाभर आहे. त्यामुळे कापूस, मूग, पपई आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापू्वी वादळवाऱ्यामुळे पपई, ऊस, कापूस, मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तो फटका सहन करत शेतकरी उभारी घेत असताना आता अतिपावसाने पिके कुजू लागली आहेत. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे यंदा समाधानकारक पाऊस होऊनही हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. 

मुगाने काढले कोंब 
शेतकऱ्यांनी मूग, चवळी व उडीदसारख्या द्विदलीय पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. गेल्या वर्षी कापूस, ज्वारी, मका, बाजरीचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास मुसळधार पावसाने हिरावला होता. मुगाचे पीक साधारण पाण्यावरही येते. त्याचबरोबर लवकर तयार होऊन पोळ्यापर्यंत बाजारपेठेत पोचते. सर्वांत आधी बाजारपेठेत येणारे हे पीक आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी या पिकाला प्राधान्य दिले आहे. मात्र काढणीच्या वेळीच संततधार सुरू झाल्याने ही पिके काढता येणे शक्य झाले नाही. पाऊस विश्रांती घ्यायलाच तयार नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांचे मूग, उडीद ही पिके कोंब काढू लागली आहेत. तर काहीजण भरपावसात मुगाच्या शेंगा तोडून गुदामात वाळावताना दिसताहेत. 
 
कापूस, मिरचीवर रोगांचा प्रादुर्भाव 
जिल्ह्यात कापूस, मिरचीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. मात्र सततच्या पावसामुळे या पिकांमध्ये पाणी साचले आहे. त्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पिके उभळून येत आहेत. उभ्या स्थितीत ते कुजताहेत. काही शेतकरी पाणी बाहेर काढत असले तरी वरून सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होत आहे. मोटारी लावून तर काही जण ट्रॅक्टरला पंप बसवून पिकांमधील पाणी बाहेर काढत आहेत. मात्र तरीही अतिपावसामुळे या पिकांवर चुरडा, मुरडा, मच्छरी, बोंडअळीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 
 
 
 
जिल्ह्यातील पावसाची स्थिती 
तालुका- आजअखेर पाऊस (मि.मी) 
नंदुरबार-६२६ 
नवापूर -६६० 
तळोदा-७२१ 
शहादा-६२१ 
अक्कलकुवा-७३० 
धडगाव- ५५८ 

एकूण - ८० टक्के (सरासरी) 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar continue rain farm water out tractor