नंदुरबार जिल्ह्यात अभूतपूर्व शांतता; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांकडून चोप

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 March 2020

पोलिसांनी समजवून सांगितल्यानंतरही न जुमानणाऱ्या काही जणांना पिटाळून लावण्यात आले. त्यामुळे दुपारी अत्यावश्‍यक सेवेसाठी आलेल्या व्यक्तीव्यतिरिक्त सर्वत्र स्मशान शांतता दिसून आली.

नंदुरबार : कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून रात्रीपासून जारी करण्यात आलेल्या संचारबंदीनंतर जिल्ह्यात अभूतपूर्व शांतता पसरली आहे. सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त तैनात आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या -जाणाऱ्या गुजरात व मध्यप्रदेश राज्याचा सीमाही सील करण्यात आल्या आहेत. दरम्यान, नंदुरबार शहरात सकाळी संचारबंदी काळातही फिरण्याची आगळीक काही अतिउत्साहीनी केलीच.

Image may contain: one or more people, people standing and outdoor

जनता कर्फ्यू नंतर कलम १४४ व त्यावरही नागरिक जुमानत नसल्याने कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शासनाने संचारबंदीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार काल (ता.२३) सायंकाळ पासूनच संचार बंदी सुरू झाली असली तरी खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी आज सकाळपासून सुरू झाली. सकाळी काहीवेळ शहरात  भाजीबाजार, किराणा दुकानांवर गर्दी होती. त्यांना सवलत दिल्यानंतर त्यासोबतच फक्त फेरफटका मारणारेही काहीजण दिसत होते. काही तरुण उगाच दुचाकी फिरवत होते.पोलिसांनी त्यांना चोप दिला.

Image may contain: one or more people, people walking and outdoor

अत्यावश्‍यक सेवेचा बाऊ
संचारबंदी काळात अत्यावश्‍यक सेवा म्हणून भाजीपाला, फळे विक्रेते व किराणा, औषध दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत. मात्र अनेकांनी त्याचा सोयीचा अर्थ काढत फिरत होते. पोलिसांनी अडविल्यास दवाखान्यात जात आहेत. भाजीपाला घेण्यासाठी जात आहे. किराणा घेण्यासाठी जात आहोत. असे कारणे सांगून  पोलिसांनी हुलकावणी देत शहरभर हिंडतांना दिसत होते. पोलिसांनाही अत्यावश्‍यक सेवेसाठी न अडविण्याचा सूचना असल्यामुळे त्यांचीही कारवाईसाठी मुस्कटदाबी झाल्यासारखे होते. मात्र हे दुपारी बारापर्यंत लक्षात आल्यानंतर पोलिसांनी उग्ररूप धारण केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले.

अनेकांना खावा लागला मार
संचारबंदी आहे हे माहिती असतांना अनेकजण शहरात फिरतांना दिसत होते. सर्वत्र दुकाने, प्रतिष्ठाने बंद असतांना फिरणाऱ्या अशा व्यक्ती व युवकांना अखेर पोलिसांनी आवाहन करूनही जुमानत असल्याचे लक्षात आल्यावर कडक कारवाईस सुरूवात केली. खऱ्या अर्थाने संचारबंदी काय असते, याचा हिसका पोलिसांनी दाखविला. त्यात अनेकांवर काठ्या पडल्या. त्यानंतर सर्वत्र रिकामे फिरणाऱ्यांनी आपआपले घरे गाठली. त्यानंतर दुपारी मात्र शहरात शांतता होती. बॅंका, दवाखाने, किराणा दुकाने व भाजीपाला विक्रेत्यांकडेही शांतता होती.

जिल्ह्यातील राज्य सीमा सील
नंदुरबार हे महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व गुजरात राज्यांना जोडणारे मुख्य ठिकाण आहे. त्यामुळे गुजरातसाठी वाका चार रस्ता, नवापूर महामार्ग, सेलंबा तर मध्यप्रदेशसाठी खेडदिगर येथून राज्य सीमा सील करण्यात आल्या आहेत. तेथे कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

एकही वाहन आले नाही ,गेले नाही
जिल्ह्यात वाहनांनाही बंदी करण्यात आले आहे. त्यामुळे शहराचा चारही बाजूचा सीमेवर रस्ते अडविण्यात आले आहेत. त्यामुळे दररोज शेकडो वाहने धावणाऱ्या शहराबाहेरील रस्त्यांवर आज एकही वाहन आले नाही किंवा गेले नाही. असे चित्र होते.

कडक कारवाई करा- डॉ. भारूड
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यातील महसूल व पोलिस यंत्रणेशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. नागरिकांचे प्रबोधन करून त्यांना गर्दी कमी करण्यास प्रवृत्त करावे. दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्यास कडक कारवाई करावी. आजाराची प्राथमिक लक्षणे असलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन अशा व्यक्तींना घरीच क्वॉरंटाईन करावे व लक्षणे वाढल्यास प्रशासनाने व्यवस्था केलेल्या ठिकाणी डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली क्वॉरंटाईन करण्यात यावे, जिल्ह्याच्या सर्व सीमांवर सुरक्षेचे पुरेसे बंदोबस्त करून बाहेरील वाहनांना शहरात प्रवेश करू देऊ नये, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीत अडथळा येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

 आवश्यक सुविधांची निर्मिती
जिल्ह्यात अधिग्रहीत केलेल्या सात क्वॉरंटाईन केंद्रात आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. याठिकाणी स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे. वैद्यकीय पथकाच्या मार्गदर्शनाखाली बेड्स आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. येत्या काळात जिल्ह्यात विषाणूचा संसर्ग अधिक प्रमाणात होऊ नये, यासाठी प्रशासनातर्फे सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे.

खबरदारी म्हणून २२ व्यक्तींवर नजर
कोरोना च्या पार्श्वभूमीवर बाहेर गावाहून आलेले व होम कोरान्टाईन मध्ये असलेल्या आजअखेर २२ व्यक्तींवर आरोग्य विभागाची करडी नजर आहे. त्यात नवापूर येथे १७ तर नंदुरबार येथे पाच जणांवर आरोग्य विभागाचे नियंत्रण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona virus impact sanchar bandi strictly follow