नियम मोडणाऱ्यांनो, आता अशी होईल कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

जमावबंदी कालावधीत ५ पेक्षा अधिक व्यक्ती किंवा समूह जमा झाल्यास, रात्री ९ ते सकाळी ५ दरम्यान फिरण्यास असलेल्या बंदीचे उल्लंघन झाल्यास, आंतरजिल्हा विनापरवाना प्रवास केल्यास, प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यक्ती इतर क्षेत्रात फिरल्यास आणि जिल्ह्यात सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम,

नंदुरबार : जमावबंदी कालावधीत प्रतिबंधित करण्यात आलेल्या बाबींचे उल्लंघन झाल्यास फिर्याद दाखल करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी संबंधित विभाग आणि अधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. 

नक्‍की पहा - तो आणि ती दोघेही अल्पवयीन...अन होत्याचे नव्हते झाले....

जमावबंदी कालावधीत ५ पेक्षा अधिक व्यक्ती किंवा समूह जमा झाल्यास, रात्री ९ ते सकाळी ५ दरम्यान फिरण्यास असलेल्या बंदीचे उल्लंघन झाल्यास, आंतरजिल्हा विनापरवाना प्रवास केल्यास, प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यक्ती इतर क्षेत्रात फिरल्यास आणि जिल्ह्यात सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, जत्रा, यात्रा, ऊरूस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा व आठवडे बाजार भरविल्यास पोलिस विभागाचे सक्षम अधिकारी फिर्याद दाखल करतील. 

मुख्याधिकारी करणार कारवाई 
सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल न वापरल्यास, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू सेवन करणे व थुंकणे, दुकानात प्रत्येक व्यक्तीमध्ये ६ फुटाचे अंतर न ठेवणे व एकाचवेळी ५ पेक्षा अधिक ग्राहक असल्यास तसेच बाजार किंवा दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेव्यतिरिक्त सुरू ठेवल्यास नगरपालिका किंवा नगर पंचायत क्षेत्र मुख्याधिकारी व ग्रामीण क्षेत्रासाठी विस्तार अधिकारी फिर्याद दाखल करतील. 

सार्वजनिक ठिकाणी दारुचे सेवन केल्यास राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे सक्षम अधिकारी, सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीसाठीच्या निर्देशाचा भंग केल्यास मोटार वाहन विभागाचे व पोलीस विभागाचे सक्षम अधिकारी, विवाह समारंभात ५० पेक्षा अधिक व्यक्ती तसेच प्रेतयात्रेत २० पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी असल्यास व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यास संबंधीत क्षेत्रातील इन्सिडंट कमांडर यांच्या निर्देशान्वये महसूल किंवा पोलिस विभागाचे सक्षम अधिकारी फिर्याद दाखल करतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी आणि करण्यात येत असलेली कारवाई जिल्हा नियंत्रण कक्षास (०२५६४-२१०००६) तात्काळ अवगत करावी, असेही आदेशीत करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona virus lockdown rules not follow