बाहेरून येणारा, आणणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार : जिल्हाधिकारी डॉ. भारूड 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

जिल्ह्याला ग्रीन झोनमध्ये ठेवण्याचे आव्हान पेलले. हे केवळ नागरीकांचा आत्मविश्‍वास, नियमांचे केलेले पालन याचे फलित आहे असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. 

नंदुरबार ः जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही म्हणून अनेकजण बाहेर गावाहून आपल्या नातेवाईकांना आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे चुकीचे आहे असे आढळून आल्यास जिल्ह्यात बाहेरून येणारा व ज्याच्याकडे येणार त्या दोघांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी आज येथे पत्रकार परीषदेत दिली. 
 
जिल्ह्याला सर्वाधिक सीमा असूनही जिल्हावासियांनी नियमांचे पालन केले. त्यातून लॉकडाऊनचा २१ दिवसाचा पहिला टप्पा पार पडला. जिल्ह्याला ग्रीन झोनमध्ये ठेवण्याचे आव्हान पेलले. हे केवळ नागरीकांचा आत्मविश्‍वास, नियमांचे केलेले पालन याचे फलित आहे असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. 

रूग्ण नाही,तरीही धोका जास्त 
लॉकडाऊनचा पहिला टप्पा आज संपला, त्याविषयी पत्रकारांशी डॉ. भारूड यांनी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश आला आहे. मुख्यमंत्र्यांशीही व्हीसी झाली. त्यावरून ज्या जिल्ह्यांमध्ये २० एप्रिलपर्यंत एकही कोरोना रूग्ण आढळणार नाही, त्या जिल्ह्यात टप्या टप्याने व्यावसायिकांना मुभा दिली जाण्याची शक्यता आहे. तरीही प्रतिबंधात्मक नियम पाळावेच लागतील. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा रूग्ण नाही. तरीही सर्वाधिक धोका नंदुरबार जिल्ह्याला आहे. सर्वाधिक सीमा या जिल्ह्याला आहेत. राज्याचे १२ चेक नाके व आतंरजिल्हा १० चेक नाके आहेत. त्यामुळे कोणाही खेळण्यावरी घेऊ नका, जिल्हा प्रशासनाला हे मोठे आव्हान आहे. 

 चेक नाक्यांवर थर्मल स्कॅनर 
जिल्ह्यातील २२ चेक नाक्यांवर थर्मल स्कॅनर मशिन ठेवण्यात येणार आहेत. तसेच १६१ गावे हे सीमालगत आहेत. तेथे ग्राम सुरक्षा दले कार्यान्वित झाले आहेत. यासह पोलिस कर्मचाऱ्यांना नागरी भागात उन्हाची तीव्रता लक्षात घेता थांबण्यासाठी मंडप, टोपी, ओआरअस, गुलकोज, पाणी यांची व्यवस्था पालिका करणार आहे. सीमेवरील गावांमध्ये ग्रामपंचायती या सुविधा पुरवतील तसे आदेश देण्यात आले आहेत. शेवटी पोलिस व ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य हे माणसे आहेत. त्यांना काहीही होणार नाही ,याची काळजी घेणे गरजेचे आहे. 

१० व्हेंटेलेटर मंजूर 
शासनाने नंदुरबार जिल्ह्यासाटी दहा व्हेंटीलेटरची मंजुरी दिली आहे. त्यासाठी निधीही प्राप्त झाला आहे. सध्या ७९ जणांचे नमुने घेतले होते. त्यापैकी ७४ निगेटिव्ह आले आहेत. ५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. 

खासगी डॉक्टरांनो,ती वेळ नको 
जिल्ह्यात खासगी रूग्णालयात रूग्णांची तपासणी केली जात नसल्याचा तक्रारी येत आहेत. याबाबत वेळोवेळी तशा सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही. म्हणजे परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. खासगी रूग्णालयांमध्ये रूग्ण तपासले जात नसल्याचे बोलले जात आहे. रूग्णांना वैद्यकीय सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे डॉक्टरांनी तसे करू नये, अन्यथा तसे आढळल्यास कारवाई करून रूग्णालयाला सील व रजिस्टेशन रद्द होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्यावी, असेही डॉ. भारूड यांनी यावेळी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Nandurbar Criminals will be charged on those who come from outside Collector Bharud order