पीक कापणी अहवाल सादर; पीकविम्याची रक्कम लवकरच

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 March 2020

पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास जून-जुलै उजाडत असे, मात्र यंदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच या प्रकरणात लक्ष घातले असल्याने सर्व प्रक्रिया वेगाने होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्‍चित राहावे, रक्कम लवकरच मिळेल. 
डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा कृषि अधीक्षक, नंदुरबार. 

 

नंदुरबार : खरीप हंगामात अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांपैकी सोयाबीन, उडिद, मूग, ज्वारी आदी पिकांच्या नुकसानीपोटी विमा रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाली आहे. कापूस आणि तुरीचा हंगाम उशिरा असल्याने त्याचाही पिक कापणी अहवाल आयुक्तालयात सादर करण्यात आला आहे.  त्यामुळे या महिनाअखेरपर्यत या शेतकऱ्यांनाही विम्याची रक्कम मिळेल अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी ‘सकाळ'शी बोलताना दिली. 

जिल्हयात ऑक्‍टोंबर २०१९ च्या महिन्यात अतिवृष्टीची नोंद झाली होती. त्याचा फटका सर्व खरिप पिकांना बसला होता. खरिपात मूग व उडिदाचे अपुऱ्या पावसाने तर सोयाबीन दहा दिवसाच्या अवकाळी पावसाने बाधित झाले. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा काढला होता. त्यामुळे योजनेंतर्गंत भरपाई लवकर मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी श्री. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील माहिती दिली. 

क्‍लिक कराः साकेगावचा उड्डाणपूल वाहतूकीस खूला 

श्री. पाटील पुढे म्हणाले, ‘पीक विम्यासाठी पात्र पिकांच्या क्षेत्रानुसार पंचनामे, पीक-कापणी प्रयोगांचे अहवाल त्या- त्या वेळी आयुक्तांमार्फत संबंधित कंपन्यांना सादर करण्यात आले आहेत. त्यानुसार खरिपातील ज्वारी, बाजरी, मूग, उडिद आदी पिकांच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. आपल्या जिल्ह्यात हे क्षेत्र तुलनेने कमी व या पिकांचा विमा बऱ्याचदा शेतकरी काढत नसतात, त्यामुळे ही संख्या अल्प असते. मात्र तुलनेने केळी, कपाशीचे क्षेत्र जास्त असून त्यांचा हंगाम उशिरा संपत असल्याने पीक कापणी अहवाल डिसेंबरअखेरपर्यत तयार झाला. पंचनाम्यांसह हा अहवाल कृषी आयुक्तालयात सादर करण्यात आलेला आहे. तेथून तो संबंधित कंपन्यांकडे लवकरच जाईल. त्यानंतर प्रक्रिया होऊन संबंधित केळी, कपाशीच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा होईल. या महिनाअखेरीस ही रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. 

आर्वजून पहा : पोलिस ठाण्यासमोर अंधार...आणि पोलिसदादा अडकला सापळ्यात ! 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Crop Sum assured soon