सेंटल किचनमधून आदिवासी पाड्यावर अन्नपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 March 2020

आदिवासी विकास विभागातर्फे मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून गरजूंना अन्नाचे वितरण करण्यात येत आहे. सुट्यामुळे शाळांत असलेला साठा तीन महिन्यांनंतर आउटडेटेड होईल, त्यापेक्षा आताच तो गरजूंना पुरविण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील इतर आश्रमशाळांमध्ये उपलब्ध असलेला साठ्याचा आढावा घेतला जात आहे. तेही त्या- त्या परिसरातील गरजूंना कसा देता येईल याचे युध्दपातळीवर नियोजन सुरू असून दोन दिवसात त्याचेही वितरण होईल. 
- वसुमना पंत, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी,नंदुरबार. 

शनिमांडळ : कोरोना विषाणू आजारामुळे दुर्गम भागातील आदिवासी पाड्यावर गैरसोय होऊ नये यासाठी आदिवासी विकास विभागाने विविध उपाययोजना सुरू केल्या असून नंदुरबारमधील नवापूर चौफुली भागात राहणाऱ्या आदिवासी तसेच मजुरांना मध्यवर्ती स्वयंपाकगृहाच्या माध्यमातून जेवण पुरविण्यात आले. मजुरी करत उदरनिर्वाह करणाऱ्या या आदिवासींना यामुळे भूक भागविण्यास मदत झाली आहे. दरम्यान उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळांतील आढावा घेत त्या वस्तूही लगतच्या गरजू तसेच निराधारांना देण्याचा विचार सुरू असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी प्रकल्पाधिकारी वसुमना पंत यांनी ‘सकाळ'शी बोलताना सांगितले. 

कोरोना संचारबंदीच्या काळात आदिवासींना उद्भवणा-या.समस्यांचे निराकरण करण्यासाठी आदिवासी विकास विभागाअंतर्गत विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्या संदर्भात अधिकाऱ्यांचे नियोजन सुरू आहे. नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असणाऱ्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहाच्या माध्यमातून शहरातील वस्त्यांवर २७ मार्चला अन्नाचे वाटप करण्यात आले. आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीशक्ती संचलित मध्यवर्ती स्वयंपाक गृह उपक्रमाच्या माध्यमातून हा उपक्रम राबण्यात येत आहे. 
 
मोबाईल व्हॉनद्वारे वितरण 
नंदुरबारमधील पाड्यावर मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून २५ मार्चपासून हा अन्नपुरवठा सुरु आहे. आदिवासी वस्तीवरील साधारण तीनशे ते चारशे लोकांना यातून जेवण पुरविले जात आहे. कुणीही आदिवासी गरीब वस्तीवर उपाशीपोटी झोपू नये या हेतूने हा पुरवठा सुरु असून जास्तीतजास्त लोकांपर्यंत अन्नपुरवठा करण्यासाठी आदिवासी विकास विभाग प्रयत्नशील आहे. हे अन्न मध्यवर्ती स्वयंपाकगृहाच्या मोबाईल व्हॅनद्वारे वितरित केले जात आहे. 
 
वितरित करताना खबरदारी 
जेवण वितरित करताना नियमांचे पालन करत एक मीटर अंतर ठेवून उभे राहण्यासाठी रिंगण तयार करण्यात येत आहेत. आदिवासींना स्वच्छतेचे महत्त्व सांगून त्यांच्या हातांचे निर्जंतुकीकरण करून जेवण दिले जाते. तहसीलदारांच्या सहकार्याने कोरोना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अंतर्गत अन्न पुरवठा करण्यासाठी पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 
 
दहा हजार गरजूंना पुरवठा शक्य 
स्वयंपाकगृहातील कर्मचारी संख्या कमी करण्यात आली आहे, मात्र शहरातील तरुण स्वयंसेवकांच्या माध्यमातून कार्यवाही केली जात आहे. दहा हजार गरजूंना अन्न पुरवठा होईल एवढे धान्य स्वयंपाकगृहात सध्या उपलब्ध आहे. आम्ही कोरोनाच्या विरोधातील या लढाईत सहभागी आहोत, कोरोनाला हरवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, असे नंदुरबार सेन्ट्रल किचनच्या अधिकारी सायली वर्मा यांनी सांगितले.” 
नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या मध्यवर्ती स्वयंपाक गृहाद्वारे सुरु असलेला हा उपक्रम कोरोनाच्या बिकट स्थितीत आदिवासी जनतेला आणि गोरगरिबांना निश्चितच दिलासा देणारा आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे साहाय्यक प्रकल्प अधिकारी(शिक्षण) नंदकुमार साबळे सांगत होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar district shanimandal corona aadivashi aria centra kichan