नंदुरबारकर धावणार; 'फिट इंडिया फ्रीडम रन' उपक्रम 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 August 2020

सध्याचा धावपळीच्या जीवनात सर्वांनाच कमी- अधिक प्रमाणात चिंता, ताण- तणावाला सामोरे जावे लागत आहे. मानवी शरीर नेहमी तंदुरुस्त, व्याधीमुक्त ठेवण्याकरिता नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.

तळोदा  मानवी शरीर तंदुरुस्त, चिंतामुक्त ठेवण्यासाठी नियमितपणे चालणे किंवा धावणे फार आवश्यक आहे. त्याचे महत्व पटवून देत, धावण्याला - चालण्याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने 'फिट इंडिया फ्रीडम रन' हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले असून नंदुरबार जिल्ह्यात २९ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान हा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

सध्याचा धावपळीच्या जीवनात सर्वांनाच कमी- अधिक प्रमाणात चिंता, ताण- तणावाला सामोरे जावे लागत आहे. मानवी शरीर नेहमी तंदुरुस्त, व्याधीमुक्त ठेवण्याकरिता नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. "धावणे" किंवा "चालणे" हे मानवी शरीराचे सर्वात मोठे स्वातंत्र्य असून त्याची सर्वोत्कृष्ट व्यायामांमध्ये गणना होते. नागरिकांनी या क्रिया नियमितपणे कराव्यात यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांची लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता, बी. पी. डायबेटीस यांसारख्या आजारांपासून मुक्तता करण्यासाठी केंद्र शासनाच्या युवा व खेल मंत्रालयाने "फिट इंडिया" उपक्रमांतर्गत 'फिट इंडिया फ्रीडम रन' हा उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यात देखील हा उपक्रम राबविण्यात येणार असून नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यात २९ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान हा उपक्रम व्यापक स्वरुपात राबविण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी या उपक्रमांमध्ये विविध विभागांना समाविष्ट करुन घेत सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.... 

सहभागी होण्याची प्रक्रिया 
नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांबरोबर सर्वसामान्य नागरिक, खेळाडू, महिला- पुरुष सर्वांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. यासाठी सहभागी झालेल्यांनी त्यांचे स्वतःचे नाव, इ मेल, संपर्क क्रमांक, धावण्याची तारीख, अंतर, राज्य, जिल्हा, गट / ब्लॉक तसेच किती अंतर चालले किंवा धावले ही माहिती www.fitindia.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या टेबल मध्ये मोबाईलद्वारे अथवा इतर अँपद्वारे रोज भरावी लागणार आहे. ही माहिती रोज अपलोड केल्यानंतर संबंधितांना उपक्रमामध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र ई मेल द्वारा प्राप्त होणार आहे.... 

उपक्रमाची संकल्पना 
२९ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान तुम्ही कोठेही, कधीही धावू , चालू शकतात. प्रत्येक जण धावण्यासाठी, चालण्यासाठी आपल्या आवडीच्या मार्ग, व्यक्तिशः अनुकूल वेळ निवडू शकतो. आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेऊन पुन्हा धावणे, चालणे ही क्रिया करता येणार आहे. प्रत्येकाला स्वतःच्या वेगाने धावणे किंवा चालण्याची मुभा असणार आहे. स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रॅकिंग ॲप किंवा जीपीएस घडाळ्याच्या वापर करुन धावलेल्या, चाललेल्या अंतराचा स्क्रीनशॉर्ट घेवून तो दिलेल्या संकेतस्थळावर रोज अपलोड करावा लागणार आहे. 
 
सध्या कोरोना काळात हा उपक्रम सर्वांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यात सहभागी व्हावे. जवळपास ३५ दिवस तुम्ही सोईनुसार धावले, चालले किंवा सायकलिंग केली तर तुम्हाला त्याची सवय लागेल, हे शरीरासाठी फार महत्त्वाचे आहे आणि हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. 
- सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी, नंदुरबार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar district sport deparment fit india freddom run activity