esakal | पालकांना दिलासा : इंग्रजी शाळांच्‍या शुल्कात १५ टक्के सूट 
sakal

बोलून बातमी शोधा

education fee

नंदुरबार शहरातील विनाअनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या सेंट मदर टेरेसा स्कूल, पी. जी. पब्लिक स्कूल, के.आर पब्लिक स्कूल, अहिंसा इंटरनॅशनल स्कूल, मिशन स्कूल, चावरा इंग्लिश स्कूलच्या शाळा व्यवस्थापनाने एकत्रितरीत्या शुक्रवारी संस्थेच्या माध्यमातून आकारल्या जाणाऱ्या फी संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.

पालकांना दिलासा : इंग्रजी शाळांच्‍या शुल्कात १५ टक्के सूट 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : लॉकडाउनमध्ये शाळा प्रशासनातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. शासनाकडून एक दमडीही न घेता विनाअनुदानित तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या प्रश्न पालकांनी फी भरून सोडवावा. यंदा शालेय फीमध्ये सरसकट १५ टक्‍के सूट देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी दिली. 

नंदुरबार शहरातील विनाअनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या सेंट मदर टेरेसा स्कूल, पी. जी. पब्लिक स्कूल, के.आर पब्लिक स्कूल, अहिंसा इंटरनॅशनल स्कूल, मिशन स्कूल, चावरा इंग्लिश स्कूलच्या शाळा व्यवस्थापनाने एकत्रितरीत्या शुक्रवारी संस्थेच्या माध्यमातून आकारल्या जाणाऱ्या फी संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पी. जी. पब्लिक स्कूलचे रुद्रप्रताप रघुवंशी, के.आर पब्लिक स्कूलचे सिद्धार्थ वाणी, अहिंसा इंटरनॅशनल स्कूलचे सौरभ मुनोत, एस. ए. मिशन स्कूलच्या नूतनवर्षा वळवी, चावरा इंग्लिश स्कूलचे फादर अँथोनी उपस्थित होते. 
डॉ. मोरे म्हणाले, लॉकडाउनमध्ये आमच्या शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत मेहनतीने काम केले आहे. मार्च-एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी काढणे, मार्कशीट बनवित ऑनलाइन अपलोड करणे इत्यादी कामे केली. त्यानंतर मे महिन्यात विद्यार्थ्यांना ई-लर्निंग सुविधा देण्याकरिता शिक्षकांनी कंबर कसली. ई लर्निंग करिता लागणारे सर्व कंटेंट मे महिन्यात बनविले व जून महिन्यात कुठलीही शासकीय आदेशाची वाट न पाहता विद्यार्थ्यांना ई-लर्निंगची व्यवस्था प्राप्त करून दिली. आजतागायत शालेय प्रशासन ई लर्निंगची सुविधा विद्यार्थ्यांना देत आहे. 

संपूर्ण फी भरणाऱ्यांना २० टक्‍के सवलत 
कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना निश्चितच आर्थिक फटका बसलेला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना मदत होण्याच्या दृष्टिकोनातून पी. जी पब्लिक स्कूल, के. आर पब्लिक स्कूल, अहिंसा इंटरनॅशनल स्कूल, एस.ए मिशन स्कूल, सेंट मदर टेरेसा स्कूल, चावरा इंग्लिश स्कूल प्रशासनाने एकत्रितरीत्या येऊन सन २०२०-२१ करिता आकारल्या जाणाऱ्या फीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण शालेय फीवर सरसकट १५ टक्के सूट देण्यात येणार आहे. ३१ ऑक्‍टोबरपर्यंत संपूर्ण फी भरणाऱ्या पालकांना अतिरिक्त ५ टक्के सूट देऊन एकूण २० टक्‍के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती डॉ. मोरे यांनी दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे