होळीच्या वेळी शेतातून बांबू कापले; त्‍याचा राग म्‍हणून आता हत्‍या

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 September 2020

शेतात लावलेला बांबू कापल्‍यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. होळीचा सण झाल्‍यानंतर हा वाद उद्‌भवला होता. त्‍यावेळी किरकोळ वाद होवून तो मिटला होता. मात्र बांबू कापल्‍याचा राग मनात कायम ठेवत अखेर आज त्‍याचा बदला म्‍हणून डोक्‍यावर वार करून हत्‍या केल्‍याची घटना आज घडली.

म्‍हसावद (नंदुरबार)  बांबूची झाडे कापल्याचा वादातून एकाचा खून झाल्याची घटना तोरणमाळ परिसरातील खड़कीचा गुराडापाडा (ता. धडगाव) येथे घडली. याबाबत म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्‍की वाचा - मजुराची पैशाची पिशवी हरविली; बाप्‍पा पावले अन्‌ त्याच्या घरी आली परत

धडगाव तालुक्यातील खडकीचा गुराडापाडा येथे खडकी येथील प्रकाश उर्फ सान्या छगन नाईक याने खडकीचा आमदरी पाडा येथील मेंरवान हुनाऱ्या रावताळे व जेलसिंग होनाऱ्या रावताळे यांच्या शेतालगत असलेली बांबूची झाडे कापली होती. यावरुन त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. होळीनंतर सदरचा वाद निर्माण झाला होता. परंतु त्यावेळी किरकोळ वाद झाल्याने मेंरवान हुनाऱ्या रावताळे व जलसिंग रावताळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली नाही. मात्र सदर वादाचा राग मनात धरुन प्रकाश नाईक याने खडकीचा गुराडापाडा शिवारात राजल्या पावरा यांच्या शेतात जलसिंग रावताळे यांच्याशी वाद घालून त्याचे डोके, कपाळ व छातीवर मारहाण करुन ठार केले. याबाबत मेरवान रावताळे यांच्या फिर्यादी वरुन संशयित प्रकाश नाईक याच्या विरोधात म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar farm cutting bambu holi and man murder