esakal | टरबूजचे उत्पादन भरघोस, परंतु विकायचं कुठे ?
sakal

बोलून बातमी शोधा

watermelon

टरबूजचे उत्पादन भरघोस, परंतु विकायचं कुठे ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिचपाडा : टरबुजाची लागवड केल्यानंतर अनेकदा अस्मानी संकटे आली. यावर मात करीत उत्तम उत्पादन हाती आले. पण आता कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनने बाजारपेठा बंद आहेत. ग्रामीण भागात काही वेळेसाठी सवलत आहे. मात्र दिवसभर बाजारपेठ बंदच असल्याने हाती आलेल्या टरबुजांची विक्री करावी कुठे, असा सवाल टरबूज उत्पादकांना पडला असून, यामुळे जिल्ह्यातील टरबूज उत्पादक हतबल झाले आहेत.

हेही वाचा: अक्कलपाडा धरणांतून "पांझरा"त आवर्तन सोडा !

जिल्ह्यात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावास सुरवात झाली. तेव्हापासून अद्यापपर्यंत ऐनवेळी शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन आल्यावर विक्री करण्यापूर्वीच अडचणी येत आहेत. लॉकडाउन होत असल्याने शेतमाल विक्री करायचा कुठे, असा सवाल उपस्थित होतो. खरेतर कृषिमाल विक्रीसाठी प्रशासनाकडून परवानगी दिली आहे. मात्र असे असताना बाजारपेठांमध्ये अनियमितता असल्याने बऱ्याचदा शेतकऱ्यांपुढे शेतमाल विक्रीचा प्रश्न उपस्थित होतो.

भरघोस उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले

नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा परिसरात काही शेतकऱ्यांनी टरबुजाचे उत्पादन घेतले आहे. तसेच नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातही मोठ्या प्रमाणात टरबुजाची लागवड झाली आहे. बेमोसमी पावसाचे संकट कायम असताना त्यावर मात करीत हजारो रुपये खर्च करून टरबुजाची यशस्वी लागवड व भरघोस उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे. मात्र कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसरातील बाजारपेठांच्या गावांमध्ये वेळेची मर्यादा ठरवून लॉकडाउन केले आहे. यामुळे हजारो क्विंटल टरबुजाची विक्री दिलेल्या वेळेत करणे अशक्य आहे.

वादळी वाऱ्यासह गारपिटीने नुकसान

दरम्यान, टरबूज लागवडीपासून तर थेट टरबुजाचे उत्पन्न हातात येईपर्यंत एकरी हजारोंचा खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. त्यातच मध्यंतरी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने काहीसे नुकसान झाले होते. मात्र या सर्वांवर मात करीत पीक हाती आले असताना विक्री करता येत नसल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत.

हेही वाचा: तीन महिन्यापासून उसाच्या पेमेंटसाठी शेतकरी ताटकळत !

फेकण्याची वेळ

टरबूज नाशवंत फळ आहे. ते वेळेवर काढले व विक्री झाली तरच त्याचा उपयोग होतो अन्यथा ते शेतातच सडते किंवा उन्हाच्या तीव्रतेमुळे तडे पडतात. त्यामुळे वेळेवर तोडणी करायचे म्हटल्यावर कोरोना काळात मजूरही मिळत नाहीत. घरच्या घरी कुटुंबातील आबालवृद्धांच्या मदतीने ते काढावे लागतात. ट्रॅक्टर भरून विकायचे म्हटल्यावर ग्रामीण भागात व परिसरात प्रचंड प्रमाणात लागवड झाल्याने ते विकतही कोणी घेत नाहीत. त्यासाठी शहरातच टरबुजाला चांगली मागणी व भावही मिळतो, मात्र लॉकडाउनमुळे पूर्ण ट्रॅक्टरभर टरबूज विकली जात नाहीत. उन्हामुळे ती कुजतात. अनेकदा ती फेकावी लागत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

आम्ही कठीण परिश्रम करून टरबुजाचे उत्पादन मिळविले. एकरी सुमारे ४० हजार रुपये इतका खर्च आला. मात्र आता कोरोनामुळे बाजारपेठा मर्यादित वेळेसाठी खुल्या असल्याने व काही ठिकाणी बंदच असल्याने टरबूज विक्री करावी कशी, असा प्रश्न आहे. यामुळे झालेला खर्चही निघेल की नाही, अशी चिंता वाटत आहे.

-मार्कस गावित, टरबूज उत्पादक, बर्डीपाडा, ता. नवापूर

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top