esakal | रात्रीतून पिकविले जातात फळे 
sakal

बोलून बातमी शोधा

fruit chemical

रात्रीतून पिकविले जातात फळे 

sakal_logo
By
रमेश पाटील

सारंगखेडा : दररोज एक सफरचंद खा आणि आजाराला दूर पळवा, केळी खा, वजन वाढवा हे हजारो वर्षापासून सांगितले जाणारे आयुर्वेदातील सत्य मागील काही वर्षापासून फोल ठरू पाहत आहे. भरघोस उत्पादन घेण्यासाठी या फळ पिकांवर रासायनिक प्रक्रियेचे डोस दिले जात असल्याने त्यातील सेंद्रिय घटक नष्ट होऊन रासायनिक घटकांची भेसळ वाढल्याने फळेही विषारी होऊ लागले आहेत. 

हेपण वाचा - गुणकारी मध चाखताय जरा थांबा...आधी हे तपासा


जंक फूड सारख्या तत्काळ बनविल्या जाणाऱ्या पदार्थासारखीच कुठलीही फळे आता त्याचा नैसर्गिक कालावधी न घेता अगोदरच परिपक्व किंवा पिकविता येऊ लागली आहेत. त्यामुळे जो तो जादा पैसे कमवायच्या स्पर्धेत हा मधला मार्ग वापरत आहेत. मात्र, या गर्भश्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी या अमृता समान फळांच्या माध्यमातून ती खाणाऱ्यांना विषाचा डोस दिला जात आहे. 
प्राचीन काळापासून केळी लगडलेल्या घडास डाग पडले की ती उतरवून नैसर्गिकरीत्या पिकविली जाते, मात्र, आता रासायनिक पावडरने केळी लवकर पिकविली जाते. त्याला पिवळा रंग आणला जातो. ती खाणाऱ्यांसाठी नुकसानकारक ठरत आहे. 

केळीसह सफरचंद, टरबूज, टोमॅटो, डाळिंब, द्राक्षे, पपई, सीताफळ आदी फळे अशाच पद्धतीने परिपक्व बनविली जातात. या पद्धतीने तयार केलेली फळे दीर्घकाळ टिकत नाहीत. ती तत्काळ खाल्ली तर ठीक अन्यथा दोन दिवसांतच ती नासतात. त्यामुळे हे लक्षात घ्यायला हवे, की अशी फळे खरेदी करून आपण एक तर पैशाची नासाडी करतो व स्वतःहून आजाराला निमंत्रण देत असतो. 

अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे दुर्लक्ष 
असा व्यवसाय करणाऱ्या वर्गात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. आपले कोणी काहीच वाकडे करीत नाहीत. अशा आविर्भावात ही मंडळी आपला व्यवसाय जोमाने करीत आहेत. दुग्धजन्य पदार्थासह फळे बाजारात होणाऱ्या या भेसळीकडे अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचेही दुर्लक्ष आहे. या विभागाने अशा भेसळयुक्त फळांची साठवणूक व विक्री करणाऱ्या काही प्रतिष्ठानांवर छापे टाकल्यास त्यातील माफियांचे धाबे दणाणून काही प्रमाणात का होईना पण या प्रकारावर अंकुश बसण्यास मदत होईल. मात्र या विभागाने तशी कारवाई करण्याची गरज आहे. 

आठवडे बाजार भेसळ विक्रीसाठी लक्ष्य . 
लालबुंद व स्वस्तात मिळणारे रासायनिक पदार्थयुक्त सफरचंद आठवडे बाजारात विक्री होते. केमिकलच्या वापर करून फळे , भाजीपाला पिकविण्याचा प्रकार वाढला आहे. ताजेतवाने दिसणारे फळांना केमिकल रंगाचा वापर करून मोठया प्रमाणात स्वस्तात विक्री करताना दिसतात . मात्र खवय्यांना लालबुंद , ताजेतवाने दिसणारे फळे कशी निर्माण केली जातात 'याची माहीती नसते. हीच फळे रुग्णांना खाऊ घालतात. अशाच प्रकारचे फळांपैकी सफरचंद विक्रेते ग्रामीण भागातील आठवडे बाजार लक्ष्य करतात. 
 

loading image