पपईचे क्षेत्र वाढूनही पीकविम्यात समावेश नाही 

कमलेश पटेल  
Friday, 7 August 2020

पपईबाबत अनेक वर्षांपासून मागणी करूनही दुजाभाव केला जात आहे. शासनाने शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन पपईचा फळपिकाचा हवामानावर आधारित फळपीकविमा योजनेत समावेश करावा,

शहादा  : फळपिकांवर विविध नैसर्गिक संकटे येऊनदेखील जिल्ह्यात फळपिकांसाठी पोषक वातावरण असल्याने दिवसेंदिवस फळबागायतीचे क्षेत्र वाढत आहे. त्यात आता केळीपाठोपाठ पपईचेही क्षेत्र वाढले आहे. राज्यात १३ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड झाली आहे. तर राज्याच्या तुलनेत एकट्या नंदुरबार जिल्ह्यात चार हजार ८६९.४० हेक्टरवर शेतकऱ्यांनी पपईची लागवड केली आहे. राज्याचा विचार केला असता जिल्हा पपई उत्पादनाबाबत हब होऊ पाहत आहे. परंतु पपई उत्पादक शेतकऱ्यांना कधी दरासाठी, तर कधी नुकसानभरपाईसाठी संघर्ष करावा लागतो. पपईचा फळपीकविमा योजनेत समावेशाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहे. 

जिल्ह्यात पाच वर्षांपासून दिवसेंदिवस पपई लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. दर वर्षी नैसर्गिक संकटांना तोंड देत बळीराजा पपईची लागवड वाढवत आहे. पपईचा समावेश फळपिकात झाला नसल्याने शासनाकडून या पिकाला हवामानावर आधारित पीकविमा लागू होत नाही. वास्तविक पाहता जिल्ह्यात केळीपाठोपाठ पपईचे क्षेत्र आहे. केळीला हवामानावर आधारित पीकविमा योजना लागू आहे. परंतु पपईबाबत अनेक वर्षांपासून मागणी करूनही दुजाभाव केला जात आहे. शासनाने शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन पपईचा फळपिकाचा हवामानावर आधारित फळपीकविमा योजनेत समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

शासनाने लक्ष देण्याची गरज 
परंपरागत शेतीत बदल करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनाने फळ पिकाकडे वळण्याचा सल्ला दिला. त्यापासून मिळणारे फायदेही लागू केले. पपई बहुवार्षिक नसल्यानेच त्याला फळपिकातून वगळण्यात आले. पूर्वी पपईचा उपयोग रासायनिक कंपन्यांमध्ये जास्त होत असे. परंतु आता पपईचे विविध वाण निर्माण झाल्याने खाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. शिवाय औषधीसाठीही मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. त्यामुळे या पिकांत अनेक विविध गुणधर्म असल्याने शासनाने या पिकाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

शहादा तालुक्‍यात सर्वाधिक लागवड 
शहादा तालुक्यातील बहुतांश शेतकरी पीकपद्धतीत बदल करून आधुनिकतेकडे वळले आहेत. सिंचन क्षेत्रही बऱ्यापैकी असल्याने दिवसेंदिवस फळपिकांचे क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक तीन हजार ३१५ हेक्टरवर शहाद्यात पपई पिकाची लागवड केली आहे. पपई खरेदी करण्यासाठी इतर राज्यांतील व्यापारी तालुक्यात दर वर्षी येतात. 

आरोग्याला हितकारक असणाऱ्या तसेच अनेक आजारांमध्ये वैद्यांकडून पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. शासनाने पपई पिकाचा फळपिकात समावेश करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. फळपिकात समावेश करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. 
-भगवान पाटील, पपई उत्पादक, शेतकरी संघर्ष समिती, शहादा 

दर वर्षी पपई पिकावर उत्पादन येण्याअगोदर लाखो रुपयांचा खर्च केला जातो. तेही उत्पादनाची शाश्‍वती नसतानाही. कधी नैसर्गिक संकट, तर कधी व्यापारांच्या मनमानीला सामोरे जात उत्पादन घेतले जाते. शासनाने पपईला हवामानावर आधारित फळविमा योजना लागू केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. 
-राकेश पाटील, पपई उत्पादक, बामखेडा 

जिल्ह्यातील पपई लागवड हेक्‍टरमध्ये 
नंदुरबार--- ११६९ 
नवापूर --७.४० 
शहादा-- ३३१५ 
तळोदा-- ३७१ 
अक्कलकुवा--७ .०० 
एकूण---- ४८६९.४०

 

संपादन- भूषण श्रीखंडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Increasing ​​papaya crops but not include crop insurance