नंदुरबार येथील मेजवानी प्रकरणी चौकशी समिती 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

मेजवानीत सहभागी झालेल्या व त्यांच्या संपर्कात 
आलेल्या व्यक्तींनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेसाठी आरोग्य विभागामार्फत तात्काळ तपासणी करून घ्यावी.

नंदुरबार : नंदुरबार येथे विवाहाप्रीत्यर्थ आयोजित मेजवानीच्या वेळी ५० व्यक्तींच्या मर्यादेचा भंग झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले असल्याने प्रस्तुत प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकारी वसुमना पंत यांनी तहसीलदार नंदुरबार व पोलिस निरीक्षक नंदुरबार यांची संयुक्त चौकशी समिती नेमली आहे. 

मेजवानीत स्वयंपाक करणारा खानसामा पॉझिटिव्ह आढळून आला आहे आणि अनेक नागरिक सहभागी झाल्याच्या वृत्ताने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. खानसामाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मेजवानीत सहभागी झालेल्या व त्यांच्या संपर्कात 
आलेल्या व्यक्तींनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेसाठी आरोग्य विभागामार्फत तात्काळ तपासणी करून घ्यावी. नागरिकांना अशा व्यक्तींची माहिती असल्यास किंवा मेजवानीचे कुठल्याही प्रकारचे छायाचित्रण अथवा व्हिडिओ उपलब्ध असल्यास तहसील कार्यालय नंदुरबार किंवा उपविभागीय कार्यालय नंदुरबार येथे सादर करावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहनही श्रीमती पंत यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Inquiry Committee on the Marriage party