वाजवा रे वाजवा..बँड, सनई-चौघड्यांचा नाद गुंजणार

धनराज माळी
Thursday, 19 November 2020

नंदुरबार जिल्ह्यात बँड व्यावसायिकांना कार्यक्रमासाठी कोणतेही प्रतिबंधित आदेश पारित केलेले नाहीत. तथापि, जिल्ह्यातील सर्व बँड व्यावसायिकांना विवाह समारंभात अटी-शर्तींच्या अधीन राहून बँड वाजविण्यास परवानगी देण्यात येत आहे. 

नंदुरबार : कोरोना महामारीमुळे बँड व्यवसाय पूर्णपणे बंद झाला होता. यामुळे पुण्याची बँड कलाकार उत्कर्ष संघटना व नंदुरबार जिल्हा बँड युनियनने यापूर्वी वेळोवेळी प्रशासनाला निवेदन दिले होते. अखेर अटी- शर्तींच्या अधीन राहून व्यावसायिकांना बँड वाजविण्याची परवानगी देण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी बुधवारी (ता. १८) सायंकाळी उशिराने जाहीर केले. यामुळे व्यावसायिकांच्‍या चेहऱ्यावर आनंद फुलला. 
नंदुरबार जिल्हा बॅंड युनियनचे जिल्हाध्यक्ष सुनील पवार, शहराध्यक्ष सागर सोनवणे व तालुका पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना मिळालेल्या पत्रात म्हटले आहे, की नंदुरबार जिल्ह्यात बँड व्यावसायिकांना कार्यक्रमासाठी कोणतेही प्रतिबंधित आदेश पारित केलेले नाहीत. तथापि, जिल्ह्यातील सर्व बँड व्यावसायिकांना विवाह समारंभात अटी-शर्तींच्या अधीन राहून बँड वाजविण्यास परवानगी देण्यात येत आहे. 

याचे पालन बंधनकारक
एकाच ठिकाणी गर्दी न करता सामाजिक अंतर राखून वाजवणे बंधनकारक राहील. तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही. रहदारीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. बँड पथकांमध्ये मालकांनी पथकातील सर्व सदस्यांचे नियमित थर्मल स्क्रिनिंग करून नोंद करणे बंधनकारक राहील. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. बँडसाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य नियमित निर्जंतुकीकरण करून वापरणे बंधनकारक राहील. 

विवाह समारंभास ५० जणानांच परवानगी
कोरोनाचा प्रादुर्भाव व संसर्ग होऊ नये, यासाठी वेळोवेळी निर्गमित होणारे शासन परिपत्रक, सूचना, आदेश व निर्णयानुसार काटेकोरपणे पालन करावे. लाउडस्पीकर लावण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र परवानगी घ्यावी. विवाह समारंभात जास्तीत जास्त ५० व्यक्तीस उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात बँड पथकातील व्यक्तींचाही समावेश राहील, असे जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. 
 
विवाह समारंभासह विविध राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जिल्ह्यातील नागरिकांनी बँड पथकाकडे नोंदणी करण्यास हरकत नाही. मात्र, जिल्ह्यातील नोंदणीकृत बँड आणि संघटनेशी संलग्न व्यावसायिकांना परवानगी दिली आहे. 
- सुनील पवार, अध्यक्ष, नंदुरबार जिल्हा बॅंड युनियन 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar marriage function band permission