दिग्गजांची राष्ट्रवादीत प्रवेशाची चर्चा निरर्थक 

धनराज माळी
Tuesday, 3 November 2020

खडसे यांना नंदुरबार जिल्ह्यातही मानणारा मोठा गट आहे. त्यांची सून तथा रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचे माहेर खेडदिगर (ता. शहादा) येथील आहे. त्यामुळे नात्यांचा गोतावळा शहादा तालुक्यात आहे. तसेच भाजपमधील अनेक जुने नेते श्री. खडसे यांना मानणारे आहेत.

नंदुरबार : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहमंत्री अनिल देशमुख व राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत भाजपमधील अनेक दिग्गज कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आठवडाभरापासून सुरू होती. ‘कोण जाणार, कोण येणार’ या चर्चेला उधाण आले होते. मात्र, या नेत्यांच्या झालेल्या दौऱ्यात कोणीही प्रवेश केला नाही. त्यामुळे पक्षांतराची चर्चा सध्या तरी निरर्थक ठरली आहे. या चर्चेत काहीही तथ्य नाही, एकही भाजपचा कार्यकर्ता पक्ष सोडणार नाही, असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केला होता. तो आज तरी खरा ठरला आहे. 

जिल्ह्यात खडसेंना मानणारा गट 
श्री. खडसे यांना नंदुरबार जिल्ह्यातही मानणारा मोठा गट आहे. त्यांची सून तथा रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचे माहेर खेडदिगर (ता. शहादा) येथील आहे. त्यामुळे नात्यांचा गोतावळा शहादा तालुक्यात आहे. तसेच भाजपमधील अनेक जुने नेते श्री. खडसे यांना मानणारे आहेत. ते भाजपमध्ये होते. तरीही त्यांचे धुळे-नंदुरबार जिल्ह्यावर विशेष लक्ष होते. अनेक पदाधिकारी त्यांच्या सल्ल्याने चालतात. विरोधी पक्षातील अनेक पदाधिकारीही श्री. खडसे यांच्या माध्यमातून कामे करून घेत. जिल्ह्यातील महत्त्वाचा सिंचन प्रकल्पाचा प्रश्न श्री. खडसे यांच्यामुळे सुटला आहे. अनेक सहकारी संस्थांनाही मदत केली. त्यामुळे शहादा तालुक्यातच नव्हे, तर जिल्हाभर त्यांचे चाहते आहेत. 

भाजपला खिंडार पडण्याची चर्चा निरर्थक 
एकनाथ खडसे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याने नंदुरबार जिल्हा भाजपमध्ये खिंडार पडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्यांचा गोतावळा, समाज, राजकीय संबंध त्यातच राष्ट्रवादी सध्या सत्तेत आहे. त्यामुळे भाजपमधील अनेक दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा १५ दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे प्रत्येक जण आपापला अंदाज बांधत कोणते दिग्गज जाणार याबाबत चर्चा करू लागले. ग्रामीण भागातही याबाबत जोरदार चर्चा सुरू होत्या. योगायोगाने रविवारी (ता. १) शहादा येथे गृहमंत्री अनिल देशमुख, श्री. खडसे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. मात्र, त्या वेळी कोणीही भाजपमध्ये कार्यकर्ता किंवा दिग्गज नेत्याने प्रवेश केला नाही. त्यामुळे भाजपला खिंडार पडण्याची चर्चा आज तरी निरर्थक ठरली. 

भाजप जिल्हाध्यक्षांचा दावा खरा ठरला 
कोणी कितीही वावड्या उठविल्या तरीही भाजपचा एकही कार्यकर्ता जाणार नाही, हे आपण यापूर्वीही बोललो आहे व यापुढेही कोणीही जाणार नाही, असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केला होता आणि तो आज तरी खरा ठरला आहे. कारण त्यांनी जिल्ह्यात केलेले संघटन अत्यंत मजबूत आहे. त्यामुळे त्यांचा कार्यकर्त्यांवर विश्वास आहे, हे यावरून दिसून येते. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar ncp no entry bjp member