esakal | कोरडी प्रकल्पासह नऊ लघू प्रकल्प भरले 
sakal

बोलून बातमी शोधा

aambebare dam

नंदुरबार जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्पासह ३६ लघू प्रकल्प आहेत. मात्र खऱ्या अथार्ने १२ लघू प्रकल्प हे महत्त्वाचे मानले जातात. जिल्ह्यात उशिरा का होईना महिनाभरात मुसळधार पाऊस झाला. भिजपाऊस झाल्याने जमिनीची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली.

कोरडी प्रकल्पासह नऊ लघू प्रकल्प भरले 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : जिल्ह्यातील कोरडी (ता. नवापूर) मध्यम प्रकल्पासह इतर नऊ लघू प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. मागील वर्षी आजच्या स्थितीला दरा प्रकल्पही भरला होता. यंदा प्रकल्पात ७३ टक्के साठा आहे. नंदुरबार शहरासाठी जीवनदायिनी ठरलेला आंबोबारा धरणही ८४ टक्के भरले आहे. यामुळे ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करणे शक्य आहे. तर शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातही या सिंचन प्रकल्पातील पाण्याचा उपयोग होणार आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्पासह ३६ लघू प्रकल्प आहेत. मात्र खऱ्या अथार्ने १२ लघू प्रकल्प हे महत्त्वाचे मानले जातात. जिल्ह्यात उशिरा का होईना महिनाभरात मुसळधार पाऊस झाला. भिजपाऊस झाल्याने जमिनीची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली. मध्यम व सिंचन प्रकल्पांमध्ये आशादायक जलसाठा आहे. यामुळे पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. 

आंबेबारा धरणात ८४ टक्के साठा 
नंदुरबार शहरासाठी जीवनदायिनी ठरलेल्या शिवण नदीवरील आंबेबारा धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. पालिकेच्‍या योग्य नियोजनामुळे भीषण टंचाईतही नंदुरबारवाशियांना मुबलक पाणीपुरवठा करण्याचे नियोजन नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी व त्यांचा नगरसेवकांनी केले होते. त्याच धरणात यंदा समाधानकारक जलसाठा उपलब्ध झाला आहे. आज मितीस ८४ टक्के जलसाठा असल्याने शहराला मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. 

पाणी टंचाई दूर 
दरवर्षी पाऊस कमी होत असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांना चार महिने उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी मात्र तशी वेळ येणार नाही. जवळपास जिल्ह्यातील सवर्च सिंचन प्रकल्पांमध्ये मुबलक साठा आहे. त्यामुळे त्या पाणीसाठ्याचा लाभ पाणी टंचाई दूर करण्यासाठी होणार आहे. 

रब्बी हंगामाला लाभ 
यावर्षी झालेल्या पावसामुळे सद्यःस्थितीत विहीरी-कुपनलिकांचा पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे खरिपातील पिकांसोबतच रब्बी पिकांसाठीही मुबलक पाणीपुरवठा होऊ शकेल, असे चित्र सध्या तरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामही आशादायक आहे. त्याबरोबरच सिंचन प्रकल्पांमधील जलसाठाही रब्बी पिकांना मिळू शकणार आहे. 

सिंचन प्रकल्प व उपलब्ध जलसाठा (टक्के)
– मध्यम प्रकल्प ः आंबेबारा - ८४, दरा- ७३, नागण- ६४, कोरडी- १०० टक्के 
– लघू प्रकल्प ः मेदीपाडा- ५८, देवळीपाडा- १००, ढोंग- १००, रंकानाला- १००, बलदाणे- ३१, चौपाळे- ९७,घोटाणे- १००, सुसरी- ८१, नेसू- १००, चिरडा- १००, धनपूर- १००, भुरीकेल- १०० 


संपादन ः राजेश सोनवणे