देऊळ बंद, यात्रोत्सवही रद्द आता फुलांचे करायचे काय

धनराज माळी
Thursday, 15 October 2020

देऊळे बंद, यात्रोत्सव बंद, धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे चांगले उत्पादन येऊन फुलांना चांगला भाव मिळेल ,अशी आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

नंदुरबार : कोरोनाने सारे काही उध्वस्त केले आहे. मात्र आज ना उद्या कोरोना जाईल व नवरात्रोत्सवाचा आणि यात्रांचा हंगाम सापडेल, त्यात फुलांची विक्री होऊन दोन पैसे हाताशी येतील, अशी अपेक्षा करीत फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना महागडी फुलांची रोपे लावून पोटचा मुलाप्रमाणे वाढविली.त्यात अतिवृष्टीने काही सडली तर जे वाचली ती बहरली मात्र नवरात्रोत्सव नाही, देऊळे बंद, यात्रोत्सव बंद, धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे चांगले उत्पादन येऊन फुलांना चांगला भाव मिळेल ,अशी आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.त्यामुळे उत्पादन खर्च निघणेही मुश्कील असल्याचे चित्र आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात गुलाब, मोगरा, झेंडूसह ग्लॅन्डर फुलांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील फुले गुजरात राज्यात विक्रीसाठी जातात. तर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे नंदुरबार शहरासह ,आष्टे, शनिमांडळ , तळोदा, शहादा, निजामपूर या परिसरात मोठ्या प्रमाणात फुलशेती केली जाते.फुलांना बाराही महिने मागणी असते. फुलांना मागणी लक्षात घेता गुलाबाचे फारसे उत्पादन होत नाही. येथील हवामाना पोषक नसल्याने गुलाबाची शेती कमी प्रमाणात केली जाते. मात्र शिर्डी, नगर, पुणे परिसरातील गुलाब मोठ्या प्रमाणात येथील विक्रेते खरेदी करतात. त्यामुळे फुल व्यवसायाला तेजी असते. त्यामुळेच फुल उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगले उत्पन्न मिळते. जिल्ह्यात सर्वाधिक फुल उत्पादक शेतकरी हे स्वतःच फुले विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना लागतो तेवढा माल ते दररोज ताजा तोडतात. लगतच्या गुजरातमध्येही काही व्यापारी फुलांची विक्री करतात. एकंदरीत नंदुरबार जिल्ह्यातील झेंडू, ग्लॅन्डर व मोगरा ही फुले लगतच्या जिल्ह्यांमध्ये व गुजरात ,मध्येप्रदेशमध्ये विक्रीला जातात. 

सण-उत्सवांचा साधला जातो हंगाम 
फुलाचे उत्पादन साधारण अडीच महिन्यापासून सुरू होते. त्यामुळे फुल शेती करणारे त्या हिशेबाने सण-उत्सव व धार्मिक कार्यक्रमांचा हंगामात फुले निघतील या हेतूने फुलांची लागवड करतात. साधारण दोन हंगाम वर्षातून घेतले जातात. नवरात्रोत्सव व दसरा ,दिवाळीचा हंगामात विशेषतः झेंडूचे फुलांना व सर्वाधिक मागणी असते.दुकाने, प्रतिष्ठानमध्ये हार बनवून लावले जातात. त्यामुळे शेतकरी हा हंगाम साधण्यासाठी धडपड करतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता झेंडूची शेती फुलविली आहे. मात्र नवरात्रोत्सव नाही, देऊळे बंद, यात्रोत्सव नाही, लग्नसराई, धार्मिक कार्यक्रम, गौरव, सत्कार नाही. त्यामुळे फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्याचा फटका फुल शेतीला व फुल विक्रेतांना बसला आहे. 

कोरोना व अतिवृष्टीने हिरावले 
कोरोनाने मार्चपासून थैमान घातले. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये साधारण पहिला लॉट लावला जातो. म्हणजे तो लॉट दररोजच्या धार्मिक कार्यक्रमांसह लग्नसराई सापडते. तर दुसरा लॉट जूनमध्ये लावला जातो .त्याचा नवरात्रोत्सव, दसरा,दिवाळी व लग्नसराई सापडते. त्यामुळे फुलांना मागणी वाढते. मात्र जूनमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे फुल शेती बहरली मात्र फुले काढून विकणार कुठे, ती घेणार कोण ?अशी स्थिती होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी फुलशेतीवर नांगर फिरविला होता. त्यानंतर जूनमध्ये दुसरा प्लॉट लावला. मात्र अतिवृष्टीमुळे झेंडू, मोगरा व ग्लॅंडरचे रोपे सडली, काही वाचली ती आता बहरली आहेत. मात्र मागणी नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. फुलशेतीही यावर्षी धोक्यात आली आहे 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar not celebration dasara and navratrostav