कामात कुचराई; घनकचरा ठेकेदाराला ५० हजारांचा दंड 

nandurbar palika
nandurbar palika

नंदुरबार : कुत्र्याने चावा घेतल्याने रेबीजमुळे बालिकेच्या मृत्यूनंतर शहरातील स्वच्छतेचा प्रश्न व त्याच पार्श्वभूमीवर हिंदू सेवा सहाय्य समितीने विविध मागण्यांसाठी केलेले उपोषण, मोर्चा काढून केलेल्या आंदोलनाची पालिकेला दखल घ्यावी लागल्यामुळे पालिकेने घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारावर ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. 
१४ ते १९ डिसेंबरपर्यंत नंदुरबार पालिकेसमोर कुत्र्याने चावा घेतल्याने मृत व्यक्तींचा मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदू सेवा सहाय्य समितीकडून नरेंद्र पाटील, मयूर चौधरी, मृत बालिकेचे वडील मुकेश माळी, मृत बलराज राजपूतचे भाऊ मोहित राजपूत यांनी सहा दिवस उपोषण केले होते. उपोषणादरम्यान पालिकेकडून समाधानकारक आश्वासन न मिळाल्याने ३० डिसेंबरला नंदुरबार नगरपालिकेवर मूक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. त्या वेळी नंदुरबार पालिकेने लेखी खुलाशात मागण्यांसंदर्भात नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापनाचे ठेकेदार यांनी कामात कुचराई किंवा विलंब केला त्याबाबत त्यांना नगर परिषदेमार्फत सक्त नोटीस व दंडात्मक कारवाई पंधरा दिवसांत करण्यात येईल, असे म्हटले होते. त्याप्रमाणे नंदुरबार पालिकेने घनकचरा व्यवस्थापनाचा मक्तेदार यांच्यावर कामात कुचराई केल्याबद्दल ५० हजार रुपये रकमेची दंडात्मक कारवाई केल्याचे दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे. 

मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण
हिंदू सेवा सहाय्य समितीने केलेल्या विविध मागण्यांपैकी एका मागणीवर पालिकेने कारवाई केली. पालिकेने बेकायदा उघड्यावरील मांस विक्री-मांसजन्य पदार्थांची दुकाने, मोकाट जनावरे-वराह यांच्यावर कारवाई करणे तसेच मोकाट कुत्रे यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी निविदा काढून ठेका देण्याची कार्यवाही त्वरित करावी, अशी मागणीही समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, मयूर चौधरी यांनी केली आहे. 
 
मृत बालिकेच्या पालकांना भरपाईकडे दुर्लक्ष 
कुत्र्याने चावा घेतल्याने मृत झालेल्या बालिकेच्या पालकांना भरपाई मिळावी ही मुख्य मागणी होती. त्यामुळे मुलीच्या वडिलांना पुढे करून आंदोलनाला इमोशनल रूप दिले गेले. ज्या मुद्द्यांवर खरे आंदोलन होते तो मुद्दा भरपाईचा मुद्दा बाजूला पडला आहे. ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून आंदोलनाचा फायदा काय झाला? खऱ्या मागण्यांकडेच दुर्लक्ष केले आहे. ठेकेदारावर कारवाईचे श्रेय संघटनेला गेले, मात्र ज्यांचा पोटचा गोळा गेला त्यांना काय मिळाले, असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com