आदेश धाब्यावर...वाळू चोरट्यांची शक्‍कल; चोरटा खेळ सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 June 2020

वाळू वाहतुकीला बंदी असल्याबाबतच आदेश वाळूमाफियांना माहित नसेल असे नाहीच, तरीही त्यांनी मुजोरी करीत जिल्ह्यातून वाहतुकीचा प्रयत्न केलाच. महसूल व पोलिसांच्या कारावईत सापडले तेवढी वाहने पकडण्यात आली, पण साऱ्यांना बगल देत निघून गेलेली वाहने कितीतरी असतील.

 
नंदुरबार : कोरोनाप्रश्‍नी दक्षता आणि जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी परराज्यातून जिल्ह्यांतर्गत वाळू वाहतुकीला बंदीचा आदेश काढूनही चोरीछुपी पद्धतीने ही वाहतूक केली जात असल्याचे दिसून येते. नवापूर, सारंघखेडा येथे अशाच वाहतूक करणाऱ्या टॅक पकडण्यात आल्या होत्या. मात्र नवापुरातील वाहने दंड भरून पुन्हा जिल्हामार्गेच गेली, त्यामुळे मुळ उद्देश बाजूला पडला. या वाहनांवर केवळ दंडाची नव्हे तर आपत्ती निवारण कायद्यानुसार थेट जप्तीची कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांतून पुढे येत आहे. 
वाळू वाहतुकीला बंदी असल्याबाबतच आदेश वाळूमाफियांना माहित नसेल असे नाहीच, तरीही त्यांनी मुजोरी करीत जिल्ह्यातून वाहतुकीचा प्रयत्न केलाच. महसूल व पोलिसांच्या कारावईत सापडले तेवढी वाहने पकडण्यात आली, पण साऱ्यांना बगल देत निघून गेलेली वाहने कितीतरी असतील. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. दरम्यान आज प्रकाशा येथे वाळू वाहतूक करणाऱ्या चार वाहनांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला. 

प्रकाशा : येथून जवळच गुजराची सीमा आहे. या सीमेवरून गुजरातमधून वाळूची वाहने प्रकाशामार्गे अन्य जिल्ह्यात नेली जात आहेत. महसूल व पोलिस प्रशासनाने दोंडाईचा तसेच लातूर, बीड आदी ठिकाणी वाळू नेणा-या चार वाहनांना पकडले. तिन्ही वाहनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी डी. एम्. चौधरी, मंडळ अधिकारी सारंगखेडा, वडाळी, मोहीदे यांच्या पथकासह हवालदार सुनील पाडवी, गौतम बोराळे आदींनी कारवाई केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar river valu vahtuk continue lockdown