नाक्‍यावर गाड्यांची तपासणी आणि ते चौघे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

सुरत येथील व्यापारी सग्नेश गणेश कन्‍हैयालाल पांड्या (४४) यांच्या ताब्यातील महिंद्रा कार नवापूरकडून सुरतकडे जात असतांना जुन्या आरटीओ नाक्याजवळ वाहनांची तपासणी करण्यात आली

नंदुरबार : जिल्ह्यात दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या सुरतच्या व्यापाऱ्यासह चौघांवर ठिकठिकाणी कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली असून वाहन चालकांनी दारू पिऊन वाहने चालवू नयेत. वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित,अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले आहे. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरत येथील व्यापारी सग्नेश गणेश कन्‍हैयालाल पांड्या (४४) यांच्या ताब्यातील महिंद्रा कार नवापूरकडून सुरतकडे जात असतांना जुन्या आरटीओ नाक्याजवळ वाहनांची तपासणी करण्यात आली असता सग्नेश पांड्या दारूच्या नशेत आढळून आले. उमेश साहेबराव पाटील (३३) रा.खडकीसिंग (ता. चाळीसगाव ) हा त्याच्या दुचाकीने सुरतकडे जात असताना नवापूर शहरातील जुन्या आरटीओ नाक्यावर तपासणी केली असता दारूच्या नशेत आढळून आला. याप्रकरणी नवापूर पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक दिगंबर शिंपी व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नासिरखा पठाण यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन व्यापारी व युवकावर गुन्हा दाखल केला. 

दुचाकी चालकही नशेत
अनिल वाल्या तडवी (वय २२) रा. टिकममौली (ता.अक्कलकुवा) याने त्याच्या ताब्यातील दुचाकीने (जी.जे ०५ एचबी २६८६) जाताना दारूचे सेवन करून वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र व वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहन चालवितांना मिळून आला. या प्रकरणी पोलीस शिपाई शरद पाटील यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात अनिल तडवी याचावर फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला. तपास पोलीस हवालदार मोहने करीत आहेत. 
धडगाव तालुक्यातील त्रिशूल येथील तीस वर्षीय युवक गुरजी नानऱ्या पावरा त्याचे ताब्यातील दुचाकीने (एम.एच १५ एएक्स १२८२) जाताना धडगाव रोड वरील चिखली फाटा येथे तपासणीत मद्याप्राशन केलेला आढळून आला. म्हसावद पोलिस पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई सिद्धार्थ सुरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरजी पावरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar rto check post checking and driver drinking