पोषण आहाराच्या तांदळाला फुटले पाय... 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 2 February 2020

पोषण आहाराच्या तांदळाबाबत झालेला प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. संबंधित मुख्याध्यापकांनी संचालक, शिक्षक यांना उसने तांदूळ देण्याबाबत कुठली पूर्वकल्पना दिली नव्हती. यासाठी संबंधित मुख्याध्यापकांवर ती कारवाई व्हावी. 
- भीमराव माळी, संचालक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, कोंढावळ. 

नंदुरबार : कोंढावळ (ता. शहादा) येथील शाळेतील सावित्रीच्या लेकींच्या पोषण आहाराचा घास हिरावला जाताना थोडक्यात वाचला. मुख्याध्यापकला त्याची विल्हेवाट लावताना ग्रामस्थांनी पकडले मात्र त्याने वेगळीच चाल रचून तो तांदूळ पुन्हा शाळेत आणला. या साऱ्या प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर शिक्षणविस्तार अधिकारी एम.एस. बंजारा यांनी शाळेत जात पंचनामा केला.आता या प्रकरणी काय कारवाई होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. 
कोंढवड येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने तांदूळ विकल्याची घटना २८ जानेवारीला घडली. संचालकांनी गटशिक्षणाधिकारींकडे तक्रार केल्याने शिक्षण विस्तार अधिकारी बंजारा यांनी शाळेस भेट देत पोषण आहाराची पाहणी करत साठ्याची नोंद घेतली आहे. 

येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या वर्षभरापासून पोषण आहार सुरू करण्यात आला. २५० विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. या पोषण आहाराचा दहा क्विंटल तांदूळ अतिरिक्त झाल्याचे दाखवित मुख्याध्यापकाने आपल्या हाताने ‘बोराळे मातकुट येथील प्राथमिक शाळेत पोषण आहारासाठी तांदूळ देण्यात यावा‘ अशी बनावट चिट्टी तयार करून आपल्या सहकारी शिक्षकांना दाखवली. २८ तारखेला दुपारी ठरल्याप्रमाणे गाडी शाळेच्या आवारात आली आणि पन्नास किलोच्या वीस गोण्या व दहा किलो मसूरडाळ असा माल गाडीत टाकण्यात आला. ग्रामस्थांनी याबाबत विचारणा केल्यावर चिठ्ठीतील कारण पुढे करत आपण उसने देत आहोत असे सांगण्यात आले. मुख्याध्यापकांनी शाळेत तांदूळ पोहोचून आपण बाहेरगावी जात आहोत असे कारण पुढे केले. याबाबत शिक्षकांनी आपसात चर्चा करत शाळेत तांदूळ पोहोचला की नाही याची खातरजमा करण्यासाठी बोराळे मातकुट येथील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता सारे पितळ उघडे पडले. 
त्या शिक्षकांनी आम्ही अशा कुठल्याच प्रकारची मागणी केली नाही असे सांगताच शिक्षकांनी झालेला प्रकार संस्थाचालकांना सांगितला. संस्थाचालकांनी गट शिक्षणाधिकारींना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी पाहणी केली असता त्यात पोषण आहाराची तपासणी केली मात्र आपली चोरी उघड झाल्याचे मुख्याध्यापकांना समजताच त्यांनी सावरासावर करत विकलेला तांदूळ रात्रीत शाळेत आणून टाकला. उसना दिलेला तांदूळ परत आणला असा देखावा तयार केला. सर्वत्र तांदूळ विकण्याची चर्चा झाल्यावर मुख्याध्यापक जी.पी. माळी आपल्या निर्णयावर ठाम होते. याप्रकरणी आता कारवाई होणार की येरे माझ्या मागल्या प्रमाणे देखावा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar school poshan aahar rice froad