नंदुरबारच्या यशानंतर राज्यात तेरा ओजस शाळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

नंदुरबार ः येथे सुरू करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेचे यश पाहून राज्यात यावर्षी तेरा ओजस शाळा सुरू करण्यात येणार आहेत. या सर्व शाळा जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या निवडण्यात आल्या आहेत. 

नंदुरबार ः येथे सुरू करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेचे यश पाहून राज्यात यावर्षी तेरा ओजस शाळा सुरू करण्यात येणार आहेत. या सर्व शाळा जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या निवडण्यात आल्या आहेत. 
जून 2018 या नव्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभागातर्फे सरकारी शाळांतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ओजस आंतरराष्ट्रीय शाळांची सुरवात करण्यात येणार आहे. जूनपासून राज्यातील तेरा, तर पुढील शैक्षणिक वर्षापासून शंभर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत. त्यात राज्यातील पहिली शाळा नंदुरबारला सुरू करण्यात आली. त्यातील यशस्विता पाहून पुढील दिशा निश्‍चित केली आहे. प्रत्येक ओजस शाळेमागे नऊ तेजस शाळा असतील. ओजस शाळा मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतील. 
राज्यातील विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग, शालेय शिक्षण विभाग यांच्या शाळांमधून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शंभर शाळा निर्माण करण्यात येत आहेत. तेरा ओजस अन्‌ त्यामागे प्रत्येकी सात ते नऊ तेजस अशा शंभर शाळांचा समावेश आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या सिंगापूर, हॉंगकॉंग, जपान येथील शिक्षण पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. समृद्ध आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम व प्रभावी अध्ययन संसाधन यांची उपलब्धता निश्‍चित करून तशी अंमलबजावणी होत आहे. 14 जुलै 2017 च्या शासन निर्णयानुसार पहिल्या टप्प्यातील तेरा ओजस शाळांची निवड झाली आहे. या शाळा मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी तयार होतील. या शाळांमधील शिक्षकांना पहिल्या टप्प्यात शासनाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यापुढील टप्प्यांमध्ये या शाळांच्या मार्गदर्शनाखाली नव्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. 

अभ्यासक्रम पूर्ण 
प्रायोगिक पथदर्शी चाचणी घेऊन पहिली ते तिसरीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. टप्प्या-टप्प्याने सर्व वर्गांचे अभ्यासक्रम तयार होत आहेत. या शाळांच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र व स्वायत्त महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ तयार केले आहे. ज्ञानाधिष्ठित, समाजाभिमुख, एकविसाव्या शतकाकरिता कौशल्ये यांना केंद्रस्थानी ठेवून अभ्यासक्रमनिर्मिती केली आहे. 

समिती स्थापन 
आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळांसाठी समिती स्थापन केली आहे. या समितीची पहिली बैठक नुकतीच झाली. "लोकल टू ग्लोबल' आणि "नोन टू अननोन' या ध्येयावर या शाळांचे काम सुरू राहणार आहे. एनसीईआरटी आणि एससीईआरटीच्या अभ्यासक्रमाचा विचार करून अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. हा अभ्यासक्रम प्रामुख्याने ज्ञान, अभिवृत्ती, उपयोजना, कौशल्य आणि सवयी या पाच प्रमुख आधारस्तंभांवर आधारित असेल. या अभ्यासक्रमात साक्षरता, वाचन, लेखन, संभाषण, श्रवण, गणन, वित्त, कला, शारीरिक शिक्षण आणि पर्यावरणशास्त्र या विषयांचा समावेश प्रस्तावित आहे. 
जूनपासून सुरू होणाऱ्या तेरा शाळांसाठी 70 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यांना सलग बावीस दिवसांचे दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे निवडलेल्या तेरा शाळा जिल्हा परिषदेच्याच मराठी माध्यमांच्या शाळा असून, मराठीबरोबरच इंग्रजी आणि अन्य विषयांचे प्रभुत्व वाढविण्यावर या शाळांमध्ये भर देण्यात येणार आहे. तोरणमाळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेच्या धर्तीवर प्रायोगिक तत्त्वावर शाळा सुरू करण्यात आली असून, राज्यातील सर्व विभागांना प्रतिनिधित्व देत आणखी बारा ठिकाणी या शाळा सुरू होणार आहेत. या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळांमुळे या जिल्हा परिषद शाळांमधील पहिली ते तिसरीचे वर्ग हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार आहेत. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी नुकतीच येथील आंतरराष्ट्रीय शाळेला भेट दिली. त्यात पाहणी करून तसा अहवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिला आहे. 

ओजस शाळा - 13 
शिक्षक - 70 
प्रशिक्षण - 22 दिवस 
ॅडेल - 03 देशांचे 
आधार - 05 घटक 
तेजस शाळा - 87

Web Title: marathi news nandurbar state ojas school