वादळी पावसाने केळी, पपई आडवी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास क्षणार्धात हिरावून घेतल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे. त्यात ८० एकरावरील लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, कृषी व महसूल विभागाने पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे. 

शहादा (नंदुरबार) : कुढावद (ता. शहादा) परिसरात आज दुपारी तीनच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अर्धा तास पाऊस झाला. त्यात केळी, पपई, ऊस, कापूस आडवा झाला. त्यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास क्षणार्धात हिरावून घेतल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे. त्यात ८० एकरावरील लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, कृषी व महसूल विभागाने पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे. 
कुढावद (ता. शहादा) गावातील दक्षिणेकडील भागात गुरुवारी दुपारी जोरदार वादळ वाऱ्यासह पाऊस झाला. १५ मिनिटे जोरदार हवा व अर्धा तास पाऊस कोसळला. यामुळे केळी व पपई दोन्ही पिके आडवे झाले. ऐन बहरात असलेल्या व फळधारणा असलेले पीक डोळ्यासमोर आडवे झाल्याने शेतकरी पुरता हताश झाला आहे. 

हजारो झाडे आडवी 
केळी व पपईची हजारो झाडे डोळ्यासमोर आडवी झाली. लाखो रुपये खर्च करून हातातोंडाशी आलेला घास हिरावल्‍याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्याचबरोबर कापूस व ऊसही आडवा झाला आहे. 

यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान.... 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या कष्टाने उभी केलेली आणि कर्ज काढून घेतलेली केळी व पपईची बियाणे ऐनवेळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. कुढावद गावातच जवळजवळ ८० एकर केळी व पपईचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये संजय चौधरी, रवींद्र चौधरी, चुनिलाल चौधरी, विनोद चौधरी, किशोर पाटील, प्रशांत पाटील, मधुकर पाटील, अनिल पाटील यांचा समावेश आहे. शासनाने लवकर पंचनामे करून शासकीय मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

शिरपूरला वादळासह पावसाची हजेरी 
शिरपूर
: शहरासह परिसरात शुक्रवारी (ता.१) दुपारी जोरदार वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने काहीवेळ नागरिकांची त्रेधा केली, मात्र नुकसान झाल्याचे वृत्त नाही. 
२३ सप्टेंबरनंतर पावसाने विश्रांती घेतली होती. उन्हाचा तडाखाही वाढला होता. ऊन वाढत जाऊन ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागण्याची भीती असतांनाच दुपारी आभाळभरून आले. गार वारा सुटल्यानंतर काही वेळातच पावसाचे थेंब पडू लागले. अर्धा तास बरसल्यानंतर हळूहळू पावसाने विश्रांती घेतली. मात्र आभाळातील ढग कायम होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी फ्लेक्सचे सांगाडे उखडले गेले. अन्य काही नुकसान झाले नाही. 

गुरुवारी दुपारी अचानक आलेल्या वादळासह पावसाने होत्याचे नव्हते केले. डोळ्यासमोरच सर्व उद्‌ध्वस्त झाल्याने आता काहीच पर्याय उरलेला नाही. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. 
-संजय चौधरी, शेतकरी, कुढावद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar with torrential rain today banana and papaya loss