आठ उपसा योजनांची महिनाअखेर चाचणी 

आठ उपसा योजनांची महिनाअखेर चाचणी 

नंदुरबार ः सातपुडा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत 21 पैकी आठ उपसा सिंचन योजनांची दुरुस्तीची कामे वेगाने सुरू असून, या योजनांची जानेवारीअखेर मुख्य जलवाहिनी आणि "रायझिंग मेन'द्वारे मुख्य वितरक चेंबरमध्ये पाणी टाकून चाचणी घेण्यात येणार आहे. सिंचन विभागाने तसे नियोजन केले असून, त्यानंतर लाभक्षेत्रातील पाणीवाटप वाहिन्यांच्या चाचणीसह दुरुस्तीची कामे पूर्णत्वास नेण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी दिली. 
कारखाना पुरस्कृत एकूण 21 उपसा सिंचन योजनांद्वारे "तापी'वरून पाणी उपलब्ध करण्यात आले होते. कालांतराने पाण्याअभावी त्या बंद पडल्या. मात्र, वीजबिल थकले होते. यामुळे दुरुस्तीच्या कामात बिलाडी त. सा, पुसनद त. सा, श्री दाऊळ मंदाणे, शिंदखेडा, श्री विंद्यावासिनी अक्कडसे, लार्ज धमाणे, सौ. कमलताई, विरदेल या पाच उपसा योजनांच्या व्यवस्थापक समित्यांच्या विनंतीनुसार या योजनांच्या थकित वीजबिलांचा पहिला हप्ता योजनांच्या वतीने कारखान्याने महावितरण कंपनीकडे अदा केला आहे. तसेच श्री जय भवानी (निमगूळ), श्री दत्त (सारंगखेडा व बामखेडा त. त.) या तीन उपसा योजनांच्या व्यवस्थापक समित्यांच्या विनंतीनुसार त्यांचाही थकीत वीजबिलाचा प्रथम हप्ता भरण्यात येईल. वरील आठ योजनांचा वीजपुरवठा पूर्ववत होऊन चाचणी घेता येईल. 

मुख्य जलवाहिनीत (रायझिंग मेन) व डिलिव्हरी चेंबर (वितरिका)मध्ये पाणी टाकून चाचणी घेतल्यानंतर लाभक्षेत्रातील वितरण जलवाहिन्यांमध्ये पाणी टाकून चाचणी घेणे, स्लुइस व्हॉल्व्ह लावणे, चेंबर बांधणे व संबंधित दुरुस्तीची कामे करणे साधारणतः मार्च 2019 अखेर अपेक्षित आहे. वरीलप्रमाणे आठ योजनांची सर्व कामे झाल्यानंतर साधारणतः तेरा हजार 310 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. 

तीन हजार हेक्‍टरवर ऊस लागवड 
उपसा सिंचन योजना सुरू झाल्यानंतर लागवडीखाली येणाऱ्या तेरा हजार हेक्‍टरपैकी किमान तीन हजार हेक्‍टरवर ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत चांगल्या प्रतीचे, जास्तीत जास्त उतारा येणारे बियाणे उधारी तत्त्वावर देण्यात येणार आहेत. प्रतिहेक्‍टरी एक मेट्रिक टन एक डोळा लागण पद्धतीने लावणीसोबत 20 गोण्या पुष्पकमल सेंद्रिय खत, कृषिनिविष्ठा देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याचेही अध्यक्ष दीपक पाटील यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com