पुनर्वसित गावाच्या वसाहतीला जिल्हाधिकाऱ्यांचे नाव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

नंदुरबार : नामांतर, नाव देणे, देऊ नये यासह नावासाठी काहीही करणारे अनेक आहेत. मात्र चांगल्या कामाच्या माध्यमातून, प्रेमाने अन्‌ कर्तव्यदक्षतेतून नाव कमावणाऱ्यांची संख्या कमी आहे. अशा बोटावर मोजता येणाऱ्या अधिकाऱ्यांत जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचा समावेश आहे. चक्‍क पाचोराबारीच्या ग्रामस्थांनी पुनर्वसित वसाहतीला जिल्हाधिकाऱ्यांचे नाव दिले आहे. 

पाचोराबारी (ता. नंदुरबार) येथे जुलै 2016 ला ढगफुटी झाली होती. या घटनेत गावातील अनेक घरे, संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. चार माणसे, अनेक पशूंचे प्राण गेले. रेल्वेपूल वाहून गेला. त्यात जे शासकीय नुकसान झाले, त्यात रेल्वेचा अधिक समावेश होता. रेल्वेचे नुकसान नजीकच्या काळात भरून निघाले. मात्र, ज्यांची घरे गेली, मनुष्यहानी झाली, त्यांचे काय, असा प्रश्‍न उभा राहिला. 
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मे 2016 ला जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत हा प्रकार झाला. दरम्यानच्या काळात त्यांच्या कामाची, स्वभावाची ओळख पटली होती. परंतु काहींनी आता शासकीय मदत येईल, ती दिली जाईल अन्‌ काम संपेल, असा कयास होता. प्रत्यक्षात घडले वेगळेच. 
श्री. कलशेट्टी यांनी जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील अनेकांची मदत घेतली. त्यासाठी अनेकांशी बोलले, संवाद साधला, बैठका घेतल्या. मदतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्थांना तयार केले. पुनर्वसनाच्या देखरेखीची जबाबदारी सामाजिक संस्थांवर दिली. त्यात आर्ट ऑफ लिव्हिंग, डोकारे साखर कारखाना, शहाद्याचा समर्पण ग्रुपसह अनेकांचे हात मदतीसाठी कामी आले. 
श्री. कलशेट्टी स्वतः रोज पाचोराबारीला भेट देत होते. त्यातून अनेकांच्या हातून मदत पोचवत त्यांनी सर्व घरांची उभारणी केली. कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून दिली. त्याचबरोबर संसार उभे करून दिले. आपल्याला या अधिकाऱ्याच्या माध्यमातून देवमाणूस भेटला, असे म्हणत ज्या भागाचे नुकसान झाले अन्‌ पुनर्वसन करण्यात आले, अशा सर्व कुटुंबांनी एकत्र येत आपल्या वसाहतीला नाव दिले, डॉ. कलशेट्टी नगर, कदाचित राज्यातील असा पहिला प्रकार असावा.

Web Title: marathi news nandurbar village collector