नांदूरवैद्यचा साडेतीनशे वर्षांपूर्वीचा पौराणिक रोकडेवाडा 

आनंद बोरा
मंगळवार, 16 जुलै 2019

नाशिक ः नांदूरवैद्य (ता. इगतपुरी) येथील साडेतीनशे वर्षांपूर्वीचा रोकडेवाडा उत्तमस्थितीत उभा आहे. वाडा पाहण्यासीा देश-विदेशातील पर्यटकांची पावले आपसूक वळतात. दोन एकरामध्ये तीन मजली दोन वाडे गावात आहेत. यशुजी रोकडे यांनी बांधलेल्या वाड्यासाठी ब्रह्मदेशातील सागाचा वापर करण्यात आला आहे. हे लाकूड वर्षभर समुद्राच्या पाण्यात आणि वर्षभर मोहरीच्या तेलात ठेवण्यात आले होते. त्यामुळे वाळवीपासून वाडा मुक्त राहिला आहे.

नाशिक ः नांदूरवैद्य (ता. इगतपुरी) येथील साडेतीनशे वर्षांपूर्वीचा रोकडेवाडा उत्तमस्थितीत उभा आहे. वाडा पाहण्यासीा देश-विदेशातील पर्यटकांची पावले आपसूक वळतात. दोन एकरामध्ये तीन मजली दोन वाडे गावात आहेत. यशुजी रोकडे यांनी बांधलेल्या वाड्यासाठी ब्रह्मदेशातील सागाचा वापर करण्यात आला आहे. हे लाकूड वर्षभर समुद्राच्या पाण्यात आणि वर्षभर मोहरीच्या तेलात ठेवण्यात आले होते. त्यामुळे वाळवीपासून वाडा मुक्त राहिला आहे.

     वाड्याच्या भिंतीवरील नक्षीकाम लक्ष वेधून घेते. त्याकाळी भिंतीवरील रंगकाम झाडांच्या चिकापासून केले गेले. काळापाषाण दगड व विटांचे बांधकाम असलेल्या वाड्याला वीसहून अधिक खिडक्‍या आहेत. उन्हाळ्यात वाड्यात थंड वातावरण राहते. भिंतीमध्ये धान्य साठवणुकीसाठी मोठी बळद आहे. दोनशे किलो गहू एका बळदमध्ये ठेवण्याची क्षमता आहे.

वाड्या मधील कचेरी खोली सुस्थितीत आहे. या ठिकाणी त्याकाळी तालुक्‍याचा न्यायनिवाडा व्हायचा. खोलीतील लाकडी सिलींग, खुर्च्या-टेबल आणि झुंबर खूप सुंदर आहेत. याच वाड्यात अभिनेते दिलीपकुमार आणि अभिनेत्री वैजयंती माला यांची भूमिका असलेल्या "गंगा-जमुना' चित्रपटाचे चित्रीकरण तीन वर्ष चालले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुद्धा वाड्यात झाले असून त्यांचे बालपण वाड्यात चित्रीत करण्यात आले. 

   वाड्याचे मालक राजाभाऊ रोकडे म्हणाले, की त्याकाळी पहिल्या मुंबई-ठाणे रेल्वेचे ठेकेदारी मिळविणारे आमचे वंशज होते. भंडारदरा, दारणा धरणाचे कंत्राट यशुजी रोकडे यांनी घेतले होते. त्यामुळे त्यांची इंग्रज अधिकाऱ्यांशी जवळीक झाली होती. व्हिक्‍टोरिया राणी आल्याची माहिती पूर्वजांकडून मौखिक स्वरुपात आमच्यापर्यंत पोचली आहे. राणी ज्या रंगाचे कपडे घालत असे, त्याच रंगाचे घोडे-बग्गी व इतर साहित्य, त्यांची छायाचित्रे संग्रही ठेवलेत. शिवाय वाड्यात पंडित जवाहरलाल नेहरू, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी आले होते. सत्याग्रह चळवळीत आमच्या वंशजांनी सक्रीय सहभाग घेतला. काळाराम मंदिरामध्ये झालेल्या कार्यक्रमाचा भोजनाचा खर्च आमच्या वंशजांनी केला होता. मंदिरातील सभामंडप आमच्या वंशजांनी बांधून दिला. 

""देवळालीच्या सैन्यदलाच्या जागेसाठी परिसरातील 18 गावे रिकामी करण्यात आली. त्यावेळी वाड्याची किंमत 18 गावांच्या किमतीएवढी असल्याने आमचे गाव संपादनातून वगळले. सरकारने पर्यटन योजना राबवल्यास वाड्याचे संवर्धन होईल आणि पर्यटकांची संख्या वाढेल. तसेच गावातील रोजगारनिर्मितीला चालना मिळेल.'' 
- राजाभाऊ रोकडे (रोकडे वाड्याचे मालक) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurvaidhya cha rokde wada