विश्‍वास हाच पुरावा; उत्पादक झोडतोय तोंड 

संदीप मोगल
रविवार, 4 मार्च 2018

लखमापूर - निसर्गाचा लहरीपणा व अठराविश्‍व दारिद्य्र संपविण्याचे स्वप्न यात दोन पैसे अधिक मिळतील या भावनेने मेहनतीने जतन केलेली द्राक्षबाग विश्‍वासातील उत्पादक किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून परव्यापाऱ्याला देऊन फसगत होण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागला आहे. यात दिंडोरी तालुक्‍यातील उत्पादकांना कोट्यवधी रुपयांना व्यापाऱ्यांनी चुना लावला आहे. व्यवहारात विश्‍वास हाच पुरावा असल्याने उत्पादकाला तोंड झोडण्याची वेळी आली आहे. 

लखमापूर - निसर्गाचा लहरीपणा व अठराविश्‍व दारिद्य्र संपविण्याचे स्वप्न यात दोन पैसे अधिक मिळतील या भावनेने मेहनतीने जतन केलेली द्राक्षबाग विश्‍वासातील उत्पादक किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून परव्यापाऱ्याला देऊन फसगत होण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागला आहे. यात दिंडोरी तालुक्‍यातील उत्पादकांना कोट्यवधी रुपयांना व्यापाऱ्यांनी चुना लावला आहे. व्यवहारात विश्‍वास हाच पुरावा असल्याने उत्पादकाला तोंड झोडण्याची वेळी आली आहे. 

मागील वर्षी खेडगाव भागातील दुलाल नास्कर या कोलकत्याच्या व्यापाऱ्याने दीड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार वणी पोलिसांमध्ये दाखल झाली. त्याला मूळ ठिकाणी शोधण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर या व्यापाऱ्याने हल्ला करत पळ काढला. अखेर कोलकता पोलिसांनी 29 जानेवारीला अटक करून नाशिक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांच्या हवाली केल्यानंतर त्याला न्यायालयाने शिक्षा दिली. अर्थात ही शिक्षा पोलिसांवर केलेल्या हल्ल्याची असली तरी त्याला पुन्हा शेतकऱ्यांच्या फसवणुकीबाबत शिक्षा होणे बाकी आहे. 

दिंडोरी येथीलच राजेंद्र कळमकर या शेतकऱ्यांचे गेल्या सात वर्षांपासून पैसे न देणाऱ्या भोसले कुटुंबीयांच्या मालकीच्या असलेल्या डीपीएस ऍग्रोफ्रेश यांच्याविरोधात सुमारे 67 लाखांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपीला पोलिसांनी अटक झाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा पाच गुन्ह्यांची संख्या वाढल्यानंतर आता हा आकडा सात ते आठ कोटींच्या आसपास गेला आहे. तो अजून दिवसागणिक वाढतच आहे. अर्थात यातील ज्ञानदेव भोसले जरी अटकेत असला तरी त्याचे पुत्र दीपक व प्रशांत अजूनही फरारी आहेत. 

व्यापाऱ्याचे पलायन झाल्यानंतर बहुतांशी शेतकरी अपमानाच्या भीतीने पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारीच दाखल करीत नाहीत. यामुळे पोलिसदप्तरी हीसुद्धा संख्या कमी असली तरी दर वर्षी कोट्यवधी रुपये व्यापारी बुडवितात हे अंतिम सत्य आहे. यात अगदी बेदाणेवाला, द्राक्षमण्यांची खरेदी-विक्री करणारे, कोल्डस्टोअरेज भाड्याने घेऊन निर्यातीचा धंदा करणाऱ्या काही तरुणांचा समावेश आहे. 

द्राक्ष उत्पादकाला कोट्यवधींचा चुना 
गेल्या अनेक वर्षांपासून द्राक्ष बागायतदार व फसवणूक ही बाब जणू "नेमेचि येतो पावसाळा' अशीच झाली आहे. पळून गेलेले व्यापारी पकडून आणल्यानंतर कायद्याच्या कचाट्यातून ते सहज सुटून जातात. अत्यंत कमी लोकांचे पैसे मिळाले आहेत. यासाठी नुकतीच सुरू झालेली रोखीने द्राक्ष खरेदी-विक्री ही संकल्पना स्वागतार्ह आहे. 
-माणिक पाटील, अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक विभाग 

जागरूकता व दक्षता हा मोठा उपाय 
पैसे बुडवून पळणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात पोलिस प्रशासन नेहमी शेतकऱ्यांसोबत राहील. शेतकऱ्यांनी व्यवहार करताना व्यापाऱ्याची कंपनी, आधारकार्ड, व्यापार परवाना, त्याची पार्श्‍वभूमीवर यांसारख्या बाबी तपासल्या पाहिजेत. पळणारे व्यापारी हे बहुधा खोटे नाव व पत्ताच सांगतात. यामुळे शोधताना अडचण येते. यासाठी जागरूकता महत्त्वाची आहे. 
-संजय दराडे,  पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण 

Web Title: marathi news nashik crime